मुंबई: प्रतिनिधी
ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट अभिनेते जयंत सावरकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. अल्पशा आजारामुळे त्यांना मागील काही दिवसापासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टी आणि रसिक प्रेक्षकांमधूनही हळहळ व्यक्त होत आहे.
सावरकर यांनी शंभराहून अधिक मराठी नाटक चित्रपट व ३० हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. एकच प्याला या नाटकातील त्यांनी साकारलेली तळी रामाची भूमिका अजरामर ठरली.
सावरकर यांचा जन्म ३ मे १९३६ रोजी कोकणातील गुहागर येथे झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. वयाच्या ७३ व्या वर्षापर्यंत अर्थात चार दशकाहून अधिक काळ त्यांनी मनोरंजन सृष्टीची सेवा केली. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. नाटक आणि चित्रपटांबरोबरच दूरचित्रवाणी मालिका आणि वेब सिरीज सारख्या नव्या माध्यमांमध्येही त्यांनी प्रभावीपणे आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला.