Home Health ‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या बेबी पावडरवर बंदीसाठी प्रयत्न

‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या बेबी पावडरवर बंदीसाठी प्रयत्न

‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या बेबी पावडरवर बंदीसाठी प्रयत्न

कर्करोगाला कारणीभूत असल्याचा आक्षेप

लंडन: जॉन्सन अँड जॉन्सन या फार्मा कंपनीची टाल्कम बेबी पावडर एकेकाळी लहान मुले आणि महिलांमध्ये खूप लोकप्रिय होती. मात्र ही पावडर कर्करोगाला कारणीभूत ठरत असल्याचे उघड झाल्यामुळे त्यावर जगभरात बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. या पावडरच्या विक्रीवर जागतिक बंदीचा प्रस्ताव देण्यासाठी खुद्द कंपनीच्या भागधारकांनीच पुढाकार घेतला आहे. या पावडरमुळे महिलांना कॅन्सर झाल्याचा दावा करणारे तब्बल ३४ हजार खटले जगभरातील विविध न्यायालयात दाखल आहेत.

अमेरिकेत या पावडरमध्ये एक प्रकारचा एस्बेस्टोस (क्रेसोटाइल फायबर) असल्याचे आढळून आले. हा घटक कर्करोगला कारण ठरत असल्याचे मानले जाते. या पावडरमुले गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचा दावा हजारो महिलांनी केला आहे. त्यानंतर कंपनीने २०२० मध्ये अमेरिका आणि कॅनडात बेबी पावडरची विक्री घटल्याचे कारण देत विक्री बंद केली. मात्र, आजही ब्रिटनसह जगातील इतर देशांमध्ये त्याची विक्री होत आहे. आता ट्युलिप शेअर या ब्रिटनमधील गुंतवणूक मंडळाने कंपनीच्या भागधारकांच्या वतीने विक्री थांबवण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव अमेरिकन शेअर बाजार नियामक संस्था ‘एसईसी’कडे पाठवण्यात आला आहे. एप्रिलमध्ये कंपनीची वार्षिक सर्वसाधारण बैठक असून, त्यात हा प्रस्ताव आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अमेरिकेतील मिसुरी न्यायालयाने कर्करोगपीडित महिलांच्या २२ याचिकांमध्ये ‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या विरोधात निर्णय दिला आहे. या मध्ये कंपनीने तब्बल २०० दशलक्ष डॉलर ( सुमारे १५ हजार कोटी रुपये ) नुकसानभरपाई दिली आहे. भविष्यात अशी भरपाई द्यावी लागू नये म्हणून, त्याने आपल्या पावडर उत्पादनाची स्वतंत्र कंपनी बनवली आणि नंतर तिला वादग्रस्तरित्या दिवाळखोर घोषित केले.

हे सर्व होऊनही, आपल्या बेबी पावडरमुळे कर्करोग होत नाही, असा कंपनीचा दावा आहे. पावडरमध्ये वापरलेले सर्व घटक सुरक्षित आहेत, असे कंपनीच्या वतीने विविध अहवालनाचा हवाला देऊन सांगण्यात येते. मात्र, ब्रिटनचे लेबर पक्षाचे खासदार इयान लॅव्हरी यांनी मागील वर्षी संसदेत सांगितले की, जॉन्सन अँड जॉन्सनने अमेरिकेच्या बाहेर टॅल्कम पावडर उत्पादनांची विक्री सुरू ठेवणे अयोग्य आहे. त्यांनी भागधारकांच्या प्रस्तावाचीच री ओढली. कर्करोगाला कारणीभूत असलेले हे उत्पादन ब्रिटन आणि जगभरात विकले जात आहे. त्यातून कंपनी प्रचंड नफा कमावत आहे, असे त्यांनी नमूद केले.