मुंबई, दि. ७ : भारताला प्रथमच जी-२० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले असून त्यानिमित्त मुंबईत येत्या १३ ते १६ डिसेंबर २०२२ या कालावधीत होणाऱ्या जी-२० परिषदेसाठी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अनिल कुंभारे यांनी सांगितले.
जी-२० परिषदेच्या संदर्भात झालेल्या तयारीचा आढावा आज मुंबईतील चार ठिकाणी (हॉटेल ग्रँड हयात, जिओ वर्ल्ड ट्रेंड सेंटर, हॉटेल ट्रायडेंट, हॉटेल ताज लँण्ड एंड) घेण्यात आला. या चार ठिकाणी जी- २० निमित्त होणाऱ्या कार्यक्रम, चर्चासत्र आणि बैठकांची माहिती आणि तेथील सुरक्षा योजनासंदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी आतापर्यंत करण्यात आलेल्या तयारीचा आणि परिषदेसाठी येत्या दिवसात आवश्यक असणाऱ्या कार्यवाहीबाबतची माहिती दिली.
बैठकीला अपर पोलिस आयुक्त विनायक देशमुख, पोलिस उपायुक्त शिवाजी राठोड, दीक्षित गेडाम, योगेश कुमार गुप्ता, राज तिलक रोशन, अनिल पारसकर, महेश चिमटे, गुप्तवार्ता विभागाचे वरिष्ठ अधिकारी, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, राजशिष्टाचार, पीआयबी यांच्याशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दि.१३ ते १६ डिसेंबर दरम्यान मुंबईत जी-२० परिषद होणार आहे. या परिषदेदरम्यान काही चर्चासत्रे, बैठका मुंबईतील हॉटेल ग्रँड हयात, जिओ सेंटर, हॉटेल ट्रायडेंट, हॉटेल ताज लँड एंड येथे होणार आहेत. या ठिकाणी सुरक्षा आणि इतर व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी आज करण्यात आली. या परिषदेसाठी येणाऱ्या मान्यवरांची सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात येणार आहेत.
जी-२० साठी आवश्यक असलेला परिसर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करुन घेण्यात येणार आहे. तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्ती या चार ठिकाणी येणार असल्याने संबंधित ठिकाणी मोजकेच प्रवेशद्वार सुरू ठेवण्यात येतील. याशिवाय २४ तास डॉक्टर आणि नर्सेसचे एक पथक नियुक्त करण्यात येणार असून प्रत्येक ठिकाणी एक रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध असणार आहे. याशिवाय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ आरोग्य सुविधेसाठी गुरुनानक इस्पितळात व्यवस्था करण्यात येणार आहे. आपत्कालीन घटना घडल्यास तत्काळ मदतीसाठी अग्निशमन दलाचे पथक आणि वाहन तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय वायरलेस व्यवस्था, वायफाय यंत्रणा, इंटरनेट ॲक्सेस, साऊंड सिस्टीम, सीसीटीव्ही, स्कॅनर व्यवस्था २४ तास तैनात करण्यात याव्यात, अशा सूचना अतिरिक्त पोलिस आयुक्त श्री. कुंभारे यांनी दिल्या. परिषदेच्या काळात त्या भागात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आवश्यक ते बदल वाहतूक व्यवस्थेत करण्यात यावेत, असेही श्री. कुंभारे यांनी बैठकीत सांगितले.