Home Politics ‘जातीऐवजी धर्माधारीत आरक्षण देण्याचा काँग्रेसचा डाव’

‘जातीऐवजी धर्माधारीत आरक्षण देण्याचा काँग्रेसचा डाव’

‘जातीऐवजी धर्माधारीत आरक्षण देण्याचा काँग्रेसचा डाव’<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

घटनाबदल आणि आरक्षण विरोधाच्या टीकेवर पंतप्रधानांचा पलटवार 

कोल्हापूर: प्रतिनिधी

मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यासाठी जाती आधारित आरक्षणाऐवजी धर्माधिकारी आरक्षण लागू करण्याचा काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांचा डाव असल्याचा आरोप करून भारतीय जनता पक्षावर केल्या जाणाऱ्या घटना बदल आणि आरक्षण विरोधाच्या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पलटवार केला.

कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील या सभेला उपस्थिती लावली.

आता होत असलेली निवडणूक ही विकसित भारतासाठी होणारी निवडणूक आहे. मात्र, विकासाच्या मुद्द्यावर आपण राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी टक्कर घेऊ शकत नाही हे लक्षात आल्यानंतर काँग्रेस आणि इंडिया आघाडीने आपली रणनीती बदलली आहे. दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय यांना आरक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवून मुस्लिमांना आरक्षणाचा लाभ देण्याचे धोरण त्यांनी अंगीकारले आहे, असा आरोप मोदी यांनी यावेळी केला.

काँग्रेसने हा प्रयोग कर्नाटक मध्ये प्रत्यक्षात आणला आहे. मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी रातोरात एका कागदावर शिक्काऊ उमटवून संपूर्ण मुस्लिम समाजाचा समावेश इतर मागासवर्गीयांमध्ये करण्यात आला. त्यामुळे इतर मागासवर्गीयांपैकी मोठा वर्ग आरक्षणापासून वंचित राहिला आहे. याचीच पुनरावृत्ती देशभर करण्याचा काँग्रेसचा डाव आहे, असेही मोदी म्हणाले.

काँग्रेसची धोरणे देशविघातक असल्याची टीका करून मोदी म्हणाले की, काँग्रेसने सत्तेवर आल्यास काश्मीर मध्ये कलम 370 पुन्हा लागू करून काश्मिरी जनतेला भारतापासून तोडण्याचा डाव आखला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्याचाही त्यांचा मानस आहे. मात्र या देशातील जनता काँग्रेसला हा उलटफेर धरू देणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ज्या काँग्रेस आणि इंडिया आघाडीची तीन आकडी संख्येने खासदार निवडून आणण्याची मारामार आहे, ते सरकार स्थापनेच्या दारापर्यंत तरी पोचणार का, अशा शब्दात मोदी यांनी विरोधकांची खिल्ली उडवली.

इंडिया आघाडीतील दक्षिण भारतातील घटक पक्ष पुन्हा भारताचे विभाजन करण्याची भाषा बोलत आहेत. दक्षिणेकडील राज्यांचा स्वतंत्र देश उभारण्याचे स्वप्न बघत आहेत. सनातन धर्मावर अशोभनीय टीका करीत आहेत. त्यांच्या या कृत्याबद्दल भारतीय जनता त्यांना माफ करणार नाही, असेही मोदी म्हणाले.

अयोध्येत राम मंदिर उभारणीचे भारतीयांचे पाचशे वर्षाचे स्वप्न साकार झाले. या मंदिर उभारणीला अनेक दशके विरोध करूनही मंदिराच्या विश्वस्तांनी काँग्रेसला माफ केले. त्यांच्या नेत्यांना घरी जाऊन कार्यक्रमाची निमंत्रण दिली. मात्र काँग्रेसने रामलल्लाचे निमंत्रण नाकारून कार्यक्रमावरच बहिष्कार घातला. वास्तविक,, राम मंदिराच्या विरोधात ज्यांनी पिढ्यानपिढ्या न्यायालयीन संघर्ष केला त्या अन्सारी परिवारातील लोकही न्यायालयाच्या निर्णयाने राम मंदिराची उभारणी झाल्यावर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. काँग्रेसने मात्र हे निमंत्रण नाकारले. नकली शिवसेना याच काँग्रेसच्या हातात हात घालून चालत असल्याचे पाहताना  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना किती वेदना होत असतील, अशी टीकाही मोदी यांनी केली.

भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने दहा वर्षात केलेल्या प्रगतीचा पटही मोदी यांनी या सभेत मांडला. आपल्या भाषणाचा समारोप करताना मोदी म्हणाले की, ही सभा संपवून परत गेल्यावर तुम्हाला जे भेटतील त्यांना माझा प्रणाम सांगा. अशा साऱ्या परिवारांचे शुभाशीर्वाद माझी ऊर्जा वाढवतील. ही ऊर्जा तुमच्याच कामाला येईल कारण तुमची स्वप्न हाच माझा संकल्प आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा केवळ तुमच्यासाठीच आहे, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. करवीरवासिनी अंबाबाईच्या चरणी माझा प्रणाम. कोल्हापूरकरांना माझा नमस्कार, या शब्दात मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि उमेदवारांचीही भाषणे झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here