छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी
महायुतीमध्ये दीर्घकाळ ताणाताणी घडवून आणणाऱ्या छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या पदरात पडला असून या ठिकाणी संदिपान भुमरे यांना महायुतीची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात दोन शिवसैनिकांमध्ये काट्याची लढत पाहायला मिळणार आहे.
छत्रपती संभाजीनगर हा मतदारसंघ दीर्घकाळ शिवसेनाकडे आहे. मात्र, शिवसेनेचे दोन गटात विभाजन झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघावर दावा सांगितला. त्यामुळे महायुतीत प्रचंड दावे प्रति दावे होऊन मतदानाच्या पहिल्या टप्प्यातील तारीख येईपर्यंत या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निश्चित होत नव्हता. मात्र एकीकडे पहिल्या टप्प्यातील मतदान होत असतानाच भुमरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
या मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे भुमरे आणि खैरे हे दोघे शिवसैनिक या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. भुमरे यांनी उमेदवारीची घोषणा होण्यापूर्वीच निवडणुकीची तयारी सुरू केली असून ते 25 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.