पिंपरी, 23 डिसेंबर – श्रीमान महासाधू मोरया गोसावी यांचे चिरंजीव नारायण महाराज यांचे आशीर्वाद बालवयात शिवाजी महाराजांनी घेतले होते. तुकोबांनी, रामदासांनी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले होते. पराभूत मानसिकतेतल्या समाजाला शिवाजी महाराजांनी मुक्त केले, असे उद्गार ज्येष्ठ इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी काढले.
श्रीमन महासाधू श्रीमोरया गोसावी यांचा 460 वा संजीवन समाधी महोत्सव सुरु आहे. महोत्सवाच्या तिस-या दिवशी ‘हिंदवी स्वराज्याचे धार्मिक धोरण व श्री देव संस्थान’ या विषयावर ज्येष्ठ इतिहास तज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त विश्राम देव, हभप आनंद तांबे, अॅड. राजेंद्र उमाप, विनोद पवार, महेश पाटसकर, अतुल भंडारे आदी उपस्थित होते.
पांडुरंग बलकवडे यांनी भारतीय संस्कृतीच्या इतिहासाचा आढावा घेत सांगितले की, संस्कृतीला कालांतराने ग्लानी येते. अशा वेळेस एखादा सत्पुरुष, विद्वान, महापुरुष निर्माण होतो आणि त्या संस्कृतीचा जीर्णोद्धार करतो. हजारो वर्षांपूर्वी वैदिक संस्कृतीमध्ये कर्मकांडाचे अवडंबर माजले. त्यातून बुद्ध, महावीर यांचा अहिंसेचा विचार सांगितला. पण, काही शतकानंतर अहिंसेचे देखील अवडंबर माजले. अशा वेळी आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्त यांना घडवले आणि हिंदूंची सार्वभौम सत्ता निर्माण केली.
जगातील सर्वात प्राचीन वाङ्मय वेदाची निर्मिती भारतात झाली. मानवी जीवनाच्या कला, स्थापत्य, शिल्प अशा सर्व कलांमध्ये आपल्या पूर्वजांनी मोठे काम केले आहे. अजंठा वेरूळ येथील लेणी, कुतुबमिनार येथील विष्णूस्तंभ, भारतीय संगीत, आयुर्वेद यांचे भारतीय संस्कृतीतील महत्व सांगत भारतीय संस्कृतीचे महत्व त्यांनी सांगितले. अलेक्झांडर, शक, हुन, कुशाण, ग्रीक, रोमन, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, अफगाण, इराणी, इंग्रज या सर्वांना भारतात यायचं होतं कारण इथली समृद्धता.
भारताच्या इतिहासाचे विडंबन झाले आहे. ज्यांना भारताने हरवले त्यांची ओळख जगज्जेता म्हणून भारताच्या इतिहासात करून दिली जाते. काही शतकं भारताने धार्मिक, राजकीय, आर्थिक गुलामी सहन केली. अशा पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांचा उदय झाला आहे. महाराजांनी शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यातून या संस्कृती, धर्म, राष्ट्र यांना स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर चांगले संस्कार झाले होते.
इंग्रजांनी भारतावर राज्य केल्यानंतर भारताला पुन्हा शिवाजी महाराजांचे स्मरण झाले. चिंचवडचे चापेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, सावरकर, भगतसिंग या सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करून स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला आणि 15 ऑगस्ट 1947 साली देशाला स्वराज्य मिळाले. स्वराज्य मिळाले मात्र सुराज्य अजून मिळाले नाही. स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी आपल्याला लढायचं आहे.
छत्रपती घराण्याकडून चिंचवड देवस्थानला दिली शेकडो पत्रे
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सर्वात जास्त इनाम चिंचवडच्या देवस्थानाला दिली आहेत. शहाजी राजांची 14 पत्र, छत्रपती शिवाजी महाराजांची 42 पत्र, छत्रपती संभाजी महाराजांची 8 पत्र, महाराणी येसूबाई यांचे एक पत्र, छत्रपती राजाराम महाराजांची 15 पत्र, छत्रपती शाहू महाराजांची 41 पत्र, दुसरे शिवाजी यांची 13 पत्र, करवीरकर दुसरे संभाजी यांची 7 पत्र, बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची 3 पत्र, थोरले विश्वनाथ पेशव्यांची 14, बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यांची 31 पत्र, माधवराव आणि सवाई माधवराव यांची काही पत्र आहेत. एखाद्या संस्थानाला मराठी राज्यकर्त्यांनी दिलेली ही सर्वात जास्त पत्र आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली महत्वाची पत्रे
1647 साली मोरया गोसावी क्षेत्र मोरगाव यांच्या इनामामध्ये विहीर पाडून तिथे आंबे, केळी अशी बागायती करावी आणि स्वराज्याला आशीर्वाद द्यावेत असे एक पत्र आहे. गोब्राह्मणप्रतिपालक ही बिरुदावली छत्रपती शिवाजी महाराजांना मोरया गोसावी संस्थानने दिली आहे. 1648 मध्ये शिवाजी महाराजांनी दिलेल्या एका पत्रात, ‘मोर्याआ गोसावी संस्थान, नारायण महाराज हे देवांचे दास आहेत. त्यामुळे त्यांचा कर माफ करण्यात आल्याचे म्हटले आहे. 1649 साली दिलेल्या एका पत्रात शिवाजी महाराजांनी मोरगावच्या संस्थानला फुलझाडे लावण्यासाठी जमीन दिली. त्यात बाधा न आणण्याबाबत सक्त तंबी देखील महाराजांनी पत्रात दिली आहे. अशा अनेक पत्रांचा उल्लेख बलकवडे यांनी केला.