रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केला विश्वास
नागपूर : प्रतिनिधी
आमच्या पक्षाकडे आमच्या कार्यकर्त्यांना चहा पाजण्यासाठीही पैसा नाही. तरीही महाराष्ट्रातून इंडिया आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील, असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
विदर्भातील इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी नागपूर येथे आलेल्या चेन्निथला यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयकर विभागाने काँग्रेस पक्षाला दिलेल्या शेकडो कोटींच्या नोटिसा आणि गोठवलेली बँक खाती, या पार्श्वभूमीवर बोलताना चेन्निथला यांनी पक्षासमोरील आर्थिक अडचणीचा पाढा वाचला. मात्र, इंडिया गाडी महाराष्ट्रातून सर्वाधिक खासदार निवडून आणेल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलेला शब्द पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
इतर पक्षांबरोबर आघाडी करताना जागावाटपात कमी जास्त होत राहते. मात्र, महाविकास आघाडीने योग्य प्रकारे जागावाटप केले आहे. एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तो उमेदवार केवळ त्या पक्षाचा नव्हे तर इंडिया आघाडीचा असल्याचे आम्ही मानतो. त्यामुळे सर्व घटक पक्ष आघाडीच्या उमेदवारांनी निवडून आणण्यासाठी कसून प्रयत्न करतील, असा दावाही त्यांनी केला.
सांगलीच्या जागेबाबत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये सुरू असलेला वाद आणि उद्यापर्यंत त्याचा निकाल लागेल. त्यानंतर जो उमेदवार ठरलेला असेल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आघाडीतील घटक पक्ष एकसंध पणाने काम करतील, असेही ते म्हणाले.