
संजय राऊत यांचा श्रीकांत शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्रात चंदा दो, धंदा लो, हा खेळ महाराष्ट्रात सुरू असून मिंधे सरकारचे युवराज त्यात मुख्य सूत्रधार आहेत, असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी, अशी मागणी करणारे पत्रही त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेली सामाजिक कामे आणि उपक्रमांना मिळालेल्या निधीचा नेमका स्रोत काय, त्यांना कोट्यावधी रुपयांच्या देणग्या देणारे दानशूर कोण, याची चौकशी धर्मादाय आयुक्तांनी करावी,, अशी मागणी ज्येष्ठ वकील नितीन सातपुते यांनी करूनही त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. माहितीच्या अधिकारातही याबाबत माहिती दिली जात नाही, असा आरोप राऊत यांनी आपल्या पत्रात केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपये गोळा केले जात असून त्याची दखल धर्मादाय आयुक्त घेत नाहीत. कारण त्यांच्यावर राजकीय दबाव आहे, असा आरोप करून राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे.