प्रकाश आंबेडकर यांचे मनोज जरांगे पाटील यांना सक्रिय राजकारणात उतरण्याचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी
गरीब मराठा समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्यक्ष राजकारणात उतरून लोकसभेची निवडणूक लढवावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देऊन जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तब्बल ३५ वर्षांपूर्वीपासून लढा दिला जात आहे. मात्र, समाजातील प्रस्थापित श्रीमंत नेते मंडळींनी या लढ्याला आवाज आणि आकार मिळू दिला नाही. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाने गरीब मराठ्यांच्या मागण्यांसाठीच्या संघर्षाला आवाज आणि आकार प्राप्त झाला आहे. तो बुलंद करण्यासाठी जरांगे पाटील यांनी लोकसभेत जावे, अशी अपेक्षा आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी लढा उभारला असून त्याला बहुसंख्य मराठा समाजाचा पाठिंबा मिळत आहे. याच मागणीसाठी लाखो आंदोलकांना घेऊन जरांगे पाटील उद्या मुंबईकडे कूच करणार आहेत. ते २६ जानेवारीला मुंबईत पोहोचणार असून त्यानंतर आरक्षण मिळेपर्यंत राजधानीत आंदोलन सुरू राहणार आहे.
जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन आंदोलन करू नये यासाठी राज्य सरकारकडून जंग जंग पछाडले जात आहे. आतापर्यंत मिळालेल्या 54 लाख कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीच्या याद्या प्रसिद्ध करून संबंधितांना प्रमाणपत्र देण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांसाठी आदेश काढला आहे. त्याचप्रमाणे मराठा समाजाचे मागासपण ठरविण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे.
मात्र, जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करण्यावर आणि आरक्षण मिळवल्याखेरीज माघार नाही, या भूमिकेवर ठाम आहेत. त्यातच त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तर राजकारणातील अनेक प्रस्थापितांचे धाबे दणाणल्याशिवाय राहणार नाहीत.