चेन्नई : वृत्तसंस्था
खेलो इंडिया युथ गेम्सच्या सहाव्या पर्वाचा थरार आजपासून (दि.१८) तमिळनाडूमध्ये सुरू होत आहे. महाराष्ट्राचे खेळाडू पुन्हा एकदा विजेतेपद राखण्यासाठी सज्ज झाले आहेत. कबड्डीसारख्या मर्दानी खेळाने चेन्नईमध्ये या स्पर्धेचा शंखनाद होणार आहे.
तमिळनाडूतील चेन्नई, मदुराई, त्रिची व कोईमतूर या चार शहरांमध्ये १८ ते ३१ जानेवारी दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश असे देशभरातील ५५००हुन अधिक खेळाडू या स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी कौशल्य पणाला लावण्यासाठी सज्ज झाले आहेत.
महाराष्ट्राचे कबड्डीचे संघ सर्वप्रथम दाखल
६ व्या खेलो इंडिया युथ गेम्ससाठी महाराष्ट्राचे दोन्ही कबड्डी संघ (मुले आणि मुली) चेन्नईमध्ये मंगळवारी सर्वप्रथम दाखल झाले. स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या सर्व खेळाडूंना विमानाने घेऊन जाण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. एकूण २४ खेळांमध्ये महाराष्ट्राचे ३८५ खेळाडू पदकासाठी झुंजणार आहेत. आपले खेळाडू यंदा देखील सर्वाधिक पदके जिंकून पुन्हा विजेतेपदाला गवसणी घालतील, असा विश्वास राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या खेळाडूंना शुभेच्छा
पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात गेल्या काही दिवसांपासून अथलेटिक्स, बास्केटबॉल, बॉक्सिंग, हॉकी, तलवारबाजी, गटका आदी खेळांचे सराव शिबीर सुरू आहेत. चेन्नईत सर्वप्रथम दाखल झालेल्या महाराष्ट्राच्या कबड्डी संघानेही याच बालेवाडीत सराव केला होता. विभागीय उपक्रीडा संचालक आणि महाराष्ट्राच्या संघाचे पथकप्रमुख विजय संतान व क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी चेन्नईत दाखल झालेल्या खेळाडूंचे स्वागत केले. अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू शकुंतला खटावकर यांनी बालेवाडीत येऊन कबड्डी संघाला शुभेच्छा दिल्या होत्या. महाराष्ट्र राज्याचे उपक्रीडा संचालक सुधीर मोरे, हॉकीपटू अजित लाक्रा, जगज्जेती नेमबाज तेजस्विनी सावंत आणि क्रीडा अधिकारी उदय जोशी यांनी खेळाडूंना चेन्नईला रवाना होण्यापूर्वी यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.