नवी दिल्ली: प्रतिनिधी
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आलेले १४१ खासदारांचे निलंबन लोकशाहीविरोधी असल्याचा विरोधकांच्या इंडिया आघाडीचा आरोप आहे. या कारवाईच्या निषेधार्थ आघाडीच्या वतीने शुक्रवार दिनांक २२ रोजी देशभरात निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली.
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आघाडीच्या या चौथ्या बैठकीला २८ पक्षांचे नेते उपस्थित होते.
संसदेत दोन तरुण स्मोक बॉम्ब घेऊन घुसल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी खासदारांनी संसदेच्या सुरक्षेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावे, अशी मागणी केली. या मागणीत काहीच गैर नव्हते. तरीही ही मागणी करणाऱ्या तब्बल १४१ खासदारांना निलंबित करून सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीची हत्या केली आहे. आघाडीच्या वतीने या कारवाईचा देशभर निषेध करण्यात येणार आहे, असे खरगे यांनी सांगितले.
जागावाटपाची चर्चा होणार राज्यपातळीवर
आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटप करण्याबाबत राज्यपातळीवर चर्चा करण्यात येणार आहे. ज्या राज्यांमध्ये घटक पक्षांमध्ये एकमत होऊ शकणार नाही, त्या राज्यातील जागांचा निर्णय केंद्रीय पातळीवरील नेत्यांकडून घेतला जाईल, असेही खरगे यांनी स्पष्ट केले.
किमान समान कार्यक्रमाबाबत एकवाक्यता
इंडिया आघाडीसाठी किमान समान कार्यक्रम असावा याबाबत घटक पक्षांमध्ये एकवाक्यता आहे. मात्र, हा कार्यक्रम निश्चित करण्यासाठी पक्षांच्या नेत्यांमध्ये अधिक चर्चा होण्याची गरज आहे. यापुढील काळात आघाडीच्या आणखी आठ ते दहा बैठका पार पडतील. त्यामध्ये विचार विनिमय करून समान कार्यक्रम निश्चित केला जाईल, असे खरगे यांनी सांगितले.
खरगे यांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे यावे
खरगे यांना इंडिया आघाडीच्या वतीने पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करावे, असा प्रस्ताव तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी आघाडीच्या बैठकीत मांडला. मात्र, खरगे यांनी याबाबत नंतर विचार करू, असे सांगितले. आधी आपण विजयी होऊ. बहुमत प्राप्त करू. त्यानंतर निवडून आलेले खासदार लोकशाही मार्गाने आपला नेता निवडतील, असे ते म्हणाले.