नागपूर: प्रतिनिधी
सत्तेत सहभागी होणारे मित्र आणि भागीदार वाढले की त्यांच्या मागणीनुसार मंत्रिमंडळामध्ये खाते बदल केला जातो. एकाच खात्यात दीर्घकाळ काम करण्याची संधी न मिळाल्यामुळे प्रभावीपणे कामकाज करता येत नाही, अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर आपली नाराजी व्यक्त केली.
गिरीश महाजन यांच्याकडे असलेले ग्रामविकास खाते बदलून त्यांच्याकडे पर्यटन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महाजन यांनी या खाते बदलामुळे आलेली नाराजी खासदार औद्योगिक महोत्सवात जाहीरपणे व्यक्त केली आहे.
आतापर्यंत तीन वेळा आपल्याकडील खाते बदलले गेले आहे. खाते बदलले की सचिव बदलतात. त्यामुळे कसे काम करावे हेच सुचत नाही. एखाद्या विभागाचे मंत्रीपद दिल्यानंतर ती जबाबदारी किमान सात-आठ महिने कायम ठेवावी. तरच काही काम करता येईल, असेही महाजन म्हणाले.
पर्यटनाकडे उद्योग म्हणून पाहण्याची गरज आहे. यापूर्वी महाराष्ट्र पर्यटनाच्या क्षेत्रात देशात दुसऱ्या क्रमांकावर होता. आता तो आठव्या नवव्या क्रमांकावर गेला आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असेही महाजन यांनी नमूद केले.
‘आता तुम्ही कायमचे पर्यटन मंत्री’
यावेळी फडणवीस यांनी महाजन यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. यापुढे तुम्ही कायमचे पर्यटन मंत्री, असा शब्द फडणवीस यांनी त्यांना दिला. उत्तर महाराष्ट्रात, विदर्भात जिथे तुम्हाला वाटेल तिथे पर्यटन वाढवा. आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, असेही फडणवीस म्हणाले.