मुंबई: प्रतिनिधी
या सोमवारी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती 15 या ज्ञान आधारित रियालिटी गेम शोमध्ये अष्टपैलू अभिनेत्री शेफाली शाह आणि प्रसिद्ध समाज सेवक हरे राम पांडे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. हरे राम जी यांना त्यांचे निकटवर्ती प्रेमाने ‘बाबा’ म्हणून संबोधतात. हरे राम जी दुर्गा मातेचे भक्त आहेत आणि नारायणसेवा आश्रम नावाची एक स्वयंसेवी संस्था चालवतात जेथे माता-पित्याने सोडून दिलेल्या मुलींना दत्तक घेऊन त्यांना सुरक्षित भविष्य देण्यासाठी ते कार्य करतात. आज ते अभिमानाने सांगतात की ते 35 मुलींचे पिता आहेत.
हरे राम जी यांनी देवघर, झारखंड येथे छोटी छोटी शिबिरे घेण्यास सुरुवात केली आणि आपले कुटुंबीय आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने त्यांनी लहान मुलींना योग्य देखभाल आणि शिक्षण देऊन त्यांना आधार दिला. कौन बनेगा करोडपतीच्या या भागात ते आपल्या जीवनातील काही हृदयस्पर्शी किस्से सांगताना दिसतील आणि तापसी या आपल्या दत्तक मुलीविषयी देखील बोलताना दिसतील.
शेफाली शाह एक अशी कसलेली अभिनेत्री आहे, जिने विविध प्रकारच्या भूमिका साकारून आपले एक खास स्थान निर्माण केले आहे. KBC च्या खेळात ती हरे राम जी यांच्या सोबत, त्यांना मदत करताना दिसेल. आमंत्रित पाहुण्यांशी गप्पागोष्टी करताना होस्ट अमिताभ बच्चन शेफाली शाहला प्रेमाने ‘मालकिनजी’ म्हणून संबोधताना दिसेल. या संबोधनाचा संदर्भ त्या दोघांनी एकत्र केलेल्या ‘व्यक्त: द रेस अगेन्स्ट टाइम’ या चित्रपटाशी आहे, ज्याचे शूटिंग करताना सेटच्या डिझाईनबद्दल देखील ती स्वतःचे मत ठासून व्यक्त करत असे.