पुणे: प्रतिनिधी
शेतमालाच्या विक्री व्यवहारात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना लुबाडून आपल्या तुंबड्या भरून घेण्याचा प्रयत्न बहुतेक दलालांकडून नेहेमीच होत असतो. आता तर कोरोना महासाथी नवी लाट येणार असल्याची भीती घालून दलालांनी शेतकऱ्यांकडे पडेल भावात शेतमालाची मागणी करत आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे प्रकार उघडकीला येत आहेत.
तब्बल अडीच वर्ष संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना महासाथीच्या विळख्यातून जरा कुठे बाहेर पडत असल्याचा दिलासा मिळत असतानाच या विषाणूने चीनमध्ये पुन्हा चीनमध्ये थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. ब्रिटन, अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांतही कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतात कोरोना साथीची परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या संभाव्य संकटाची भीती घालून शेतकऱ्यांची लुबाडणूक करण्यास दलालांनी सुरुवात केली
समाजमाध्यमात पोस्ट करून सांगली जिल्ह्यातील एका तरुणाने या प्रकारांना वाचा फोडली आहे. त्याची ही पोस्ट प्रातिनिधिक स्वरूपाची असून अशाच प्रकारे अनेक शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात असणार हे उघड आहे. या तरुणाचे वडील सांगली जिल्ह्यातील तडवळे या गावाचे फलोत्पादक शेतकरी आहेत. त्यांच्या बागेमध्ये विविध फळांची ११० कलमे आहेत. त्यामधून सरासरी दीड टन फळांचे उत्पादन होते. सध्याच्या काळाची गरज ओळखून त्यांनी आपल्या बागेत कोणत्याही रासायनिक खतांचा अथवा औषधांचा वापर केलेला नाही. पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने त्यांनी आपली बाग जोपासली आहे.
आगामी काळात कोरोना महासाथीची पुढची लाट येणार असून त्यामुळे व्यवहार पुन्हा ठप्प होणार आहेत, अशी भीती दाखवून दलाल मातीमोल भावाने फळांची मागणी करत आहेत, असे या तरुणाने नमूद केले आहे. त्याने आपल्या फळांची ऑनलाईन विक्री करता येईल का, याची चाचपणी करण्यासाठी असे व्यवहार करणाऱ्या काही प्रसिद्ध वेबसाईटसना ईमेल पाठविले. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. जर आपली
फळे ऑनलाईन विकता आली नाहीत तर सलग तिसऱ्या वर्षी ती घाटा सहन करून विकण्याची पाळी येणार आहे, असेही या तरुणाने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
हा ११० कलमांचा दीड टन उत्पादन घेणारा बागायतदार म्हणजे ऑनलाईन विक्री करणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या दृष्टीने दुर्लक्ष करण्याच्या पात्रतेचा आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला बसून आपल्या फळांची आपणच किरकोळ विक्री करण्याइतका तो छोटाही नाही. फळे नाशिवंत असल्याने किरकोळीत दीड टन फळे विकली जाईपर्यंत त्याची नासाडी होण्याची शक्यताच अधिक आहे.
या तरुणाची पोस्ट प्रसिद्ध झाल्यावर त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांची हतबलता व्यक्त करणाऱ्या पोस्ट्स अधिक असल्या तरी काही दिलासा देणाऱ्या, मार्ग सुचविणाऱ्याही आहेत. एका शेतकऱ्याने आपल्या मालाची रास्त भावात विक्री करण्यासाठी सुरू केलेल्या https://mobile.Twitter.com/HarvestingFN या ट्विटरवरील नेटवर्कची लिंकही दिली आहे. मात्र अनेक जणांनी दलाल मंडळींना दोषी ठरविणारी आणि कोल्ड स्टोअरेजची आवश्यकता व्यक्त करणारी प्रतिक्रिया दिली आहे.