पिंपरी : दुचाकी अडवून व्यावसायिकाकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिला असता ”मी इथला भाई आहे” असे म्हणत कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत रोकड लुटली. हा प्रकार कासारवाडी येथे घडला. या प्रकरणी पियुष वासुदेव जाधवानी (रा. सिंडिकेट बँकेजवळ, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शकील कासम शेख (वय २५, रा. नांगेरी चाळ, कासारवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी हे जामा मशीद रोडने विद्या विकास शाळेसमोरून दुचाकीवरून जात असताना आरोपीने त्यांची दुचाकी अडवली. शिवीगाळ करीत पैसे दे म्हणाला. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला असता आरोपीने ”मी इथला भाई आहे, ज्याला फोन करायचा त्याला कर , पण पैसे द्यावेच लागतील” असे म्हणाला. त्यावर फिर्यादीने त्यांच्या भावाला बोलावून घेतले असता आरोपीने दोघांकडे पैशांची मागणी केली. त्यांनी नकार दिल्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या कानाखाली मारली. कोयता बाहेर काढून ‘मी इथला भाई आहे माहीत नाही का, पैसे द्या नाहीतर मारून टाकीन’ अशी धमकी दिली. दरम्यान, फिर्यादी यांनी मदतीसाठी लोकांना आवाज दिला मात्र भीतीने लोक पळू लागले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या पाकिटातून एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. कोयत्याचा धाक दाखवून ”तुम्हाला कुठे तक्रार करायची तेथे करा” असे धमकावले. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.