पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील कर्वेनगर भागात केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत’ या पुस्तिकेचे वाटप मतदारांना मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी आणि प्रांतिक प्रतिनिधी रमेश अय्यर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी व निवडणूक निर्वाचन अधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे अधिकृतपणे तक्रार नोंदवली आहे.
या प्रसंगी पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस चेतन अगरवाल आणि महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडिया सरचिटणीस सुरेश कांबळे उपस्थित होते.
या तक्रारीत म्हटले आहे की, निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर केंद्र वा राज्य सरकार अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या कोणत्याही कामाचा प्रचार कोणत्याही स्वरुपात करता येणार नाही. मात्र निवडणूक आयोगाला धाब्यावर बसवून केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत’ पुस्तिकेचे वितरण कर्वे नगर परिसरात दिनांक ३ एप्रिल रोजी राजरोसपणे चालू होते मतदारांना हे पुस्तक देऊन भाजपाला मतदान करण्याविषयी सांगितले जात होते हा आदर्श आचारसंहितेचा भंग असून सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच आचारसंहितेची पायमल्ली करीत आहेत.
त्यामुळेच या संदर्भात सखोल चौकशी करून ‘विकसित भारत’ पुस्तकाच्या वाटपाला प्रतिबंध करावा. ज्यांनी ही पुस्तके वाटली वा वाटत आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व त्यांना अटक करावी तसेच ही पुस्तके कोणी व कोठे छापली याचा शोध घेऊन उचित कारवाई करावी अशी मागणी करून अन्यथा कॉंग्रेस पक्ष या विरुद्ध तीव्र निदर्शने करेल असा इशारा मोहन जोशी यांनी दिला.