काश्मिरी पंडित आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांना जम्मू काश्मीर विधानसभेत तीन राखीव जागा देणारी विधेयके लोकसभेत संमत
नवी दिल्ली: प्रतिनिधी
जम्मू काश्मीरमधील आरक्षित मतदारसंघाबाबत दोन सुधारणा विधेयके लोकसभेत मंजूर करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत बोलताना, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या दोन चुका काश्मीरला अजूनही भोवत आहेत, अशी टीका गृहमंत्री अमित शहा यांनी केली.
जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेत स्थलांतरित काश्मिरी पंडितांसाठी एक पुरुष व एक महिला आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांसाठी एक अशा तीन जागा आरक्षित ठेवण्याचे सुधारित विधेयक सरकारच्या वतीने लोकसभेत मांडण्यात आले. हे विधेयक बहुमताने संमतही करण्यात आले.
पाकिस्तानशी सुरू असलेल्या युद्धाच्या वेळी भारतीय सैन्याची विजयाकडे वाटचाल सुरू असताना पंडित नेहरू यांनी युद्धविराम मान्य करून एक चूक केली. ती चूक जर टळली असती तर पाकव्याप्त काश्मीर आज भारताच्या ताब्यात असते, असा दावा शहा यांनी यावेळी केला. त्याचप्रमाणे काश्मीरचा अंतर्गत प्रश्न संयुक्त राष्ट्र संघापर्यंत नेण्याची दुसरी गंभीर चूकही पंडित नेहरू यांनी केली, असेही ते म्हणाले.
नव्याने संमत झालेल्या सुधारित विधेयकांमुळे आतापर्यंत ज्यांच्यावर अन्याय झाला त्या काश्मिरी पंडित आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांवरील अन्याय दूर होण्यास मदत होणार आहे, असा दावाही शहा यांनी केला.
काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये आर्थिक विकास मूळ धरू लागला आहे, असा दावा करतानाच शहा यांनी मनोरंजन क्षेत्राच्या वाढीचे उदाहरण दिले. कलम 370 रद्द केल्यानंतर सन 2021 मध्ये काश्मीरमध्ये पहिले मल्टिप्लेक्स चित्रपटगृह उभारण्यात आले आणि सध्या किमान 100 नवीन चित्रपटगृह उभारण्यासाठी वित्त सहाय्याचे अर्ज बँकांमध्ये आहेत. त्याचप्रमाणे या कालावधी हिंसाचाराला आळा बसल्यामुळे तब्बल 100 हून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण काश्मीरमध्ये पार पडल्याचेही त्यांनी नमूद केले.