पिंपरी चिंचवड : मातंगऋषी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विवेकवादी विचारवंत डॉ.श्रीपाल सबनीस यांची निवड करण्यात आली आहे. मातंग साहित्य परिषदेच्या वतीने आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात राजवाडा लॉन्स, काळेवाडी, पिंपरी, पुणे येथील राजवाडा लॉन्स येथे मातंगऋषी साहित्य संमेलनाचे आयोजन रविवार, दि.२०/११/२०२२ रोजी सकाळी ८ ते सायं ५.००वाजे पर्यंत करण्यात येत आहे.
जेष्ठ साहित्यिक संपत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या निवड समितीने मातंगऋषी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विवेकवादी विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस ह्यांची निवड केली आहे. डॉ.श्रीपाल सबनीस ह्यांच्या निवासस्थानी जावून ज्येष्ट साहित्यीक संपत जाधव ह्यांच्या हस्ते डॉ.श्रीपाल सबनीस यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ.धनंजय भिसे,विशाल गवळी इत्यादी मान्यवर ह्या वेळी उपस्थित होते.
श्रीपाल सबनीस हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे तौलनिक भाषा विभागात प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचे ते अधिष्ठाता होते. सबनीस ह्यांना मराठी लेखक, अभ्यासक व समीक्षक म्हणून जनमानसात त्यांची ओळख आहे. जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून तौलनिक भाषा विभागप्रमुख आणि प्रोफेसर म्हणून निवृत्ती घेतल्यावर व कला विद्याशाखेचे डीन म्हणून काम केल्यावर ते प्राचार्य पदावरून रिटायर झाले आहेत.
सबनीस यांचे ६२ हून अधिक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील लेखक व कवींच्या कवितासंग्रह, कांदबरी, नाटक, लेखसंग्रह, स्तंभलेखनसंग्रह इत्यादी तब्बल ३३६ हून अधिक वाड्मयीन पुस्तकांना त्यांच्या प्रस्तावना आहेत. ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदसह विविध ८२ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. महाराष्ट्रातील नामवंत नियतकालिकांत विविध विषयांवर त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (२०१६-२०१९) झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात हजाराहून अधिक व्याख्याने झाली आहेत.