
राहुल गांधी यांचा भाजप आणि संघावर हल्लाबोल
नागपूर: प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार एककल्ली आणि राजेशाही पद्धतीचा आहे. भारतीय जनता पक्षात वरून आदेश येतो आणि तो कार्यकर्त्यांना पाळावा लागतो. काँग्रेसची संस्कृती वेगळी आहे. काँग्रेसने भारतीय जनतेला तब्बल पाचशे ते सहाशे राजांची राजेशाही मोडीत काढून सर्वसामान्य जनतेला राज्य करण्याचा अधिकार दिला, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.
काँग्रेसच्या १३९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेत राहुल गांधी बोलत होते. सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांची इंडिया आघाडी यामधील संघर्ष केवळ राजकीय आणि सत्तेसाठी नाही तर तो वैचारिक लढा आहे, असे गांधी यांनी यावेळी नमूद केले.
… म्हणून पटोले हद्दपार
वस्तू आणि सेवा करा बाबत काँग्रेसचे सध्याचे नेते नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक प्रश्न विचारला. आपले सरकार जो वस्तू आणि सेवा कर करदात्यांवर लागू करत आहे, त्यात शेतकऱ्याचा वाटा किती असा प्रश्न पटोले यांनी मोदी यांना विचारला. तो प्रश्न न आवडल्यामुळे पटोले यांना हद्दपार करण्यात आले. भारतीय जनता पक्षामध्ये लोकशाहीला थारा नाही. तिथे वरून आदेश येतो आणि तो कार्यकर्त्यांना चुपचाप पाळावा लागतो, अशा शब्दात गांधी यांनी भाजपवर टीका केली.
काँग्रेसने देशाला लोकशाही दिली
काँग्रेसने देशाला काय दिले असा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो. देश पारतंत्र्यात असताना किंवा स्वातंत्र्य मिळाल्यावर देशात जवळजवळ ५०० ते ६०० राजे होते. राजेशाहीमध्ये सर्वसामान्य नागरिकाला कोणतेही अधिकार नव्हते. एखाद्या गरीब माणसाची जमीन राजाला आवडली तर राजा ती हस्तगत करू शकत असे. राजाला प्रतिबंध करणारा कोणताही कायदा नव्हता. तो काँग्रेसने आणला. काँग्रेसने देशाला लोकशाही दिली. सर्वसामान्य नागरिकाला मताचा अधिकार दिला. दलित, आदिवासी, महिला यांनाही सत्तेत अधिकार दिला, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
स्वातंत्र्यलढा केवळ इंग्रजांच्या विरोधातच नाही तर…
देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसने लढा दिला. या लढ्यात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू तुरुंगात गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीर्घकाळ संघर्ष केला. हा लढा केवळ आक्रमक इंग्रजांच्या विरोधात होत असे नाही. हा लढा राजेशाहीच्याही विरोधात होता. देशातील बहुसंख्य राजांची सत्ताधीश इंग्रजांबरोबर भागीदारी होती. इंग्रजांबरोबरच राजेशाहीच्या विरोधातही गरीब जनतेसाठी काँग्रेसने लढा दिला, असेही राहुल गांधी यांनी नमूद केले.
अस्पृश्यता ही संघाची विचारधारणा
स्वातंत्र्यापूर्वी सर्वसामान्य जनतेला कोणतेही अधिकार नव्हते. दलितांना तर कोणी शिवतही नव्हते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अस्पृश्यता ही विचारधारणा आहे. सत्तारूढ भाजप देशाला पुन्हा त्या मार्गावर नेऊ पाहत आहे. निवडणूक आयोग, न्यायालय अशा लोकशाही टिकवणाऱ्या स्वायत्त संस्थांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कब्जा करू पाहत आहे. सध्या विद्यापीठांचे कुलगुरू हे एकाच विचारसरणीचे आहेत. तिथे गुणवत्तेला कोणतीही किंमत नाही. सर्वसामान्य जनतेचा आवाज असलेल्या माध्यमांनाही संघाने आपल्या ताब्यात घेतले आहे. काँग्रेसला ही परिस्थिती बदलायची आहे. आम्ही देशाच्या जनतेला शक्ती देऊ इच्छितो, असे राहुल गांधी म्हणाले.
महाराष्ट्र ही काँग्रेसची जमीन
महाराष्ट्र ही काँग्रेसचा विचार रुजलेली जमीन आहे. या जमिनीत वाढलेल्या माणसांना काँग्रेसचा विचार समजावून सांगावा लागत नाही. महाराष्ट्रातील लोक ‘शेर गब्बर’आहेत. म्हणूनच काँग्रेसच्या वर्धापनदिनी आम्ही महाराष्ट्रात आलो आहोत. महाराष्ट्रातील जनतेने घाबरण्याचे कारण नाही. काँग्रेस पक्ष आणि जनता एकत्र येऊन महाराष्ट्रात आणि देशात निवडणुका जिंकेल, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
… तर जातनिहाय जनगणना करून दाखवू
सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने लाखो लोकांना गरिबीच्या खाईत ढकलले आहे. मनरेगा सारख्या योजनेतून काँग्रेसने गरिबांना गरिबीतून वर आणण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न सत्तारूढ भाजपने मातीस मिळविला आहे. काँग्रेसला करोडपती लोकांचा स्वप्नातला भारत आणि प्रत्यक्षातला गोरगरीब जनतेचा भारत अशी विभागणी नको आहे. देशातील बहुतांश संपत्ती आणि उद्योगधंद्यांचा नफा ठराविक कुटुंबांच्या खिशात जात आहे. देशात वीस टक्के इतर मागासवर्गीय आहेत. दलित १५ टक्के तर आदिवासी १२ टक्के आहेत. देश चालविणाऱ्या ९० आयएएस अधिकाऱ्यांपैकी केवळ ३ इतर मागासवर्गीय अधिकारी आहेत. त्यांना कोपऱ्यात बसवले जाते. किरकोळ विभागावर नेमणूक केली जाते. भारतातील कोणत्याही मोठ्या कंपन्या काढून बघितल्या तरीही त्यात हीच अवस्था आहे. त्यामुळे जातनिहाय जनगणना आवश्यक आहे. काँग्रेसचे सरकार देशात सत्तेवर आले तर जातनिहाय जनगणना केली जाईल, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली.