पुणे : प्रतिनिधी
“चित्रकार मुक्तहस्ते भवतालाचे प्रतिबिंब कॅनव्हासवर रेखाटत असतो. चित्रकाराच्या कल्पनेतून साकारलेल्या चित्रामुळे समाजाला दिशा देखील मिळत असते. मुठा नदीच्या सौंदर्यासाठी व संवर्धनासाठी चित्रकारांनी रेखाटलेली चित्रे दिशादर्शक आहेत,” असे मत प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांच्या पुढाकारातून काँग्रेसतर्फे आयोजित १९ व्या सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात ‘मुठाई : काल, आज आणि उद्या’ या विषयावर आयोजित चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरणात खटावकर बोलत होते. सार्थक भरेकर, सिमरन मिरवानी, तनिषा कुलकर्णी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. जीवन अडसूळ, तनय घाडगे, आयुष दीक्षित व हेतवी शहा यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
मुठा नदीच्या काठावर वृद्धेश्वर घाटावर झालेल्या या स्पर्धेवेळी चित्रकार व कलाकार डॉ. धनंजय देशपांडे, काँग्रेसचे दत्ता बहिरट, संयोजक पीयूष शहा, सौरभ अमराळे, काँग्रेसचे कार्यकर्ते चेतन अग्रवाल, सुरेश कांबळे, अयुब पठाण, बाबा सय्यद, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे, कै. सि. धो. आबनावे कला महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्याणी साळुंके आदी उपस्थित होते.
डॉ. धनंजय देशपांडे म्हणाले, “मुठा नदी पुण्याची जीवनवाहिनी आहे. नदीचे संवर्धन, तिची स्वच्छता कशी असावी, तिची सद्यस्थिती कशी आहे आणि ती पूर्वीच्या काळी पुण्याच्या वैभवात कशी भर घालत होती, याचे सुंदर मिश्रण या चित्रकला स्पर्धेतून पाहायला मिळाले. चित्रकारांनी आपल्या नजरेतून, कल्पनेतून अतिशय मोहक चित्रे रेखाटली आहेत. नदी वाचवण्यात चित्रकारांचा पुढाकार महत्वाचा ठरतो.”
दत्ता बहिरट म्हणाले, ” सोनिया गांधी आणि मोहन जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या १९ वर्षांपासून हा सप्ताह सातत्याने आयोजित होत आहे. समाजाच्या विविध घटकांना अनेक उपक्रमांतून सहभागी करून घेतले जाते. सोनियाजींच्या सेवा, कर्तव्य आणि त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा आहे.”
पियुष शहा यांनी सूत्रसंचालन केले. सौरभ अमराळे यांनी प्रास्ताविक केले. चेतन अग्रवाल यांनी आभार मानले. कल्याणी साळुंके यांनी स्पर्धेचे संयोजन केले.