उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्पष्ट निर्वाळा
मुंबई: प्रतिनिधी
विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हेच शिवसेनेचे उमेदवार असतील आणि भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभा राहील, असा स्पष्ट निर्वाळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. कल्याण डोंबिवली मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार द्यावा. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी आम्ही काम करणार नाही, असा इशारा देणारा ठरावच भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी सादर केला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या लोकसभा निवडणूक उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊनही त्यात श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे विरोधक, विशेषतः शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाची खिल्ली उडवली आहे. तुम्हाला स्वतःची उमेदवारी जाहीर करता येत नाही तर विजयाचे दावे कशाच्या आधारावर करतात, असा सवाल त्यांनी शिंदे गटाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.
या पार्श्वभूमीवर खुद्द फडणवीस यांनीच या वादावर पडदा टाकला आहे. शिंदे गटाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच फडणवीस यांनी कल्याण डोंबिवली मधून श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील. त्यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध नाही. भाजपचे कार्यकर्ते पूर्ण ताकतीनिशी त्यांचे काम करतील, अशी नि:संदिग्ध ग्वाही त्यांनी दिली आहे.