भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित
‘कथा कीर्तन महोत्सव’
पुणे: प्रतिनिधी
भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित
‘कथा कीर्तन महोत्सव’मध्ये चौथ्या दिवशी गुरुवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी ,सायंकाळी ६ वाजता श्रेयस कुळकर्णी यांनी नारदीय कीर्तनाचा भक्तिमय आविष्कार पुणेकरांना घडविला ! पारंपारीक पद्धतीने त्यांनी नारदीय कीर्तन सादर केले तसेच भक्त त्यागराज यांच्या भक्तीची महती गायली.’राम गावा, राम घ्यावा, राम जिवीचा विसावा’ हा संत रामदासांचा अभंग आणि त्याचे निरूपण त्यांनी या दरम्यान सादर केले.पुणेकर रसिकांचा या कीर्तनाला चांगला प्रतिसाद मिळाला .
महाराष्ट्रातील शेकडो वर्षांच्या कीर्तन परंपरांचा परिचय आजच्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित कथा कीर्तन महोत्सवात हे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.
भारतीय विद्या भवन बंगळुरू केंद्राच्या सह संचालक नागलक्ष्मी राव, ज्येष्ठ नेते ऍड. श्रीकांत शिरोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले आणि सूत्रसंचालन केले.
श्रीकांत शिरोळे म्हणाले “पूर्वीपासून कीर्तनाच्या माध्यमातून लोकजागृती केली गेली. सांस्कृतिक आनंदाचा ठेवा म्हणून त्याकडे पाहिले जात होते.परमेश्वराबरोबर संवाद साधण्याचे साधन किर्तन हे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देखील देशप्रेम पसरविण्यासाठी हे माध्यम उपयुक्त ठरले. सर्व धर्मात परमेश्वर चरणी लीन होण्याचे मार्ग सांगीतले आहेत.
सप्ताहभर कथा कीर्तन
सप्ताहातील पाचवे पुष्प शुक्रवार, दि. १ डिसेंबर रोजी,सायंकाळी ६ वाजता कीर्तनचंद्र श्रेयस बडवे व किर्तन चंद्रिका सौ मानसी बडवे पती-पत्नीच्या ” कीर्तन जुगलबंदीने” गुंफले जाणार आहे. या मालिकेतील सहावे पुष्प शनिवार ,दिनांक २ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या राष्ट्रीय कीर्तनाने गुंफले जाणार आहे.
महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ दरम्यान ” कीर्तन परंपरा – काल, आज व उद्या” या महत्त्वाच्या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ माध्यमतज्ञ प्रा.डॉ. विश्राम ढोले, तत्वज्ञान व प्राच्य विद्या यांचे अभ्यासक व संशोधक डॉ. प्रणव गोखले सहभागी होणार असून ह .भ. प. प्रा. अभय टिळक हे परिसंवादाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
याच दिवशी सायंकाळी सहा वाजता कीर्तन महोत्सवाचा समारोप होणार आहे. यावेळी प्रारंभी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या अध्यक्षा श्रीमती लीना मेहंदळे यांचे “महाभारतातील किर्तन परंपरा” यावर व्याख्यान होणार असून त्यानंतर ठाणे येथील युवा कीर्तनकार अमेय बुवा रामदासी यांचे रामदासी कीर्तन सादर होणार आहे.
भारतीय विद्या भवनच्या सेनापती बापट रस्त्यानजीकच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहामध्ये या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील कीर्तन महाविद्यालयाचे विद्यार्थी, अभ्यासक, रसिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय विद्या भवन तर्फे करण्यात आले आहे.प्रवेश मोफत आहे.