कडेगाव – कडेगाव नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 11 जागा जिंकत भाजपने सत्ताधारी काँग्रेसला धोबीपछाड दिला आहे. काँग्रेसला केवळ 5 जागावर समाधान मानावे लागले आहे. शहरात नवख्या असलेल्या राष्ट्रवादीनेही निवडणुकीत 1 जागा जिंकत धक्का दिला आहे. नगरपंचायतीत सत्तांतर झाल्याने कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना हा धक्का मानला जात आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना हा निकाल बळ देणारा ठरला आहे. येथे तीन ठिकाणी शिवसेनेने तर दोन ठिकाणी अपक्षांनी निवडणूक लढवली परंतु त्याना यश मिळाले नाही. निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
नगरपंचायतीमध्ये भाजपने सत्तांतर घडवून ताकद दाखवली आहे. राज्यमंत्री कदम यांना हा धक्का मानला जात आहे. राज्यात महाआघाडी असताना येथे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले. त्यामुळे बिघाडी झाली. मत विभागणीचा भाजपला फायदा झाला. त्यामुळे आता राज्यमंत्री कदम पुढील रणनिती काय ठरवणार याकडे लक्ष लागले आहे.