
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेन्ट (एनआयपीएम), पुणे यांचा उपक्रम
पुणे : दिनांक १० डिसेंबर २०२२ : औद्योगिक संबंध क्षेत्रातील आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी सहानुभूती व मानवता या गुणांचा अवलंब करणे गरजेचे आहे,असे मत नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट च्या पुणे विभागाने आयोजित केलेल्या परिसंवादात तज्ञांनी व्यक्त केले. केवळ नियम व कायद्यावर बोट धरून कामगारांचे प्रश्न सोडणविण्याचा प्रयत्न न करिता कामगार व व्यवस्थापन यांच्यातील सामोपचार कायम राखण्याची कार्यशैली औद्योगिक संबंध अधिकाऱ्यांनी विकसित करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.
एनआयपीएम च्या पुणे विभागाने शनिवारी शिवाजीनगर येथील महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या सभागृहात ‘औद्योगिक संबंधासाठी भविष्यातील आव्हाने’ या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादाची सुरुवात जेष्ठ विधिज्ञ ऍड. धनंजय भणगे यांच्या व्याख्यानाने झाली.
त्यानंतर प्रथम सत्रात फोर्स मोटर्स लि. समूहाचे मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी, राहुल बागले, कामगार कायदा क्षेत्रातील तज्ज्ञ ऍड. आदित्य जोशी, शेफलर इंडिया लि. चे मुख्य मनुष्यबळ अधिकारी रुपेश पनाम्बुर या मान्यवरांनी मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली. तर परिसंवादाच्या द्वितीय सत्रात महिंद्रा अँड महिंद्रा लि. चे कामगार संबंध विभागाचे महाव्यवस्थापक श्रेयस आचार्य यांनी विविध उदाहरणांचे दाखले देत मनोगत व्यक्त केले.
परिसंवादाच्या शेवटच्या सत्रात केएसपीजी ऑटोमाटिव्ह प्रा. लि च्या मनुष्यबळ विभागाचे संचालक विक्रम म्हस्के, विलो मॅथर अँड प्लॅट पम्प्स प्रा. लि च्या मनुष्यबळ विभागाचे उपाध्यक्ष नीतीन असालकर व किर्लोस्कर ब्रदर्स लि. च्या संस्था रूपांतरण विभागाचे उपाध्यक्ष मंगेश कुलकर्णी या मान्यवरांनी मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली.
या परिसंवादाचे समन्वयक म्हणून इमर्सन ऑटोमेशन सोल्युशनच्या मनुष्यबळ व औद्योगिक संबंध विभागाच्या प्रमुख हेमांगी धोकटे व एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीस लि. च्या कामगार संबंध व औद्योगिक संबंध विभागाचे उपाध्यक्ष कल्याण पवार यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनआयपीएम च्या पुणे विभागाचे अध्यक्ष सदाशिव पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन एनआयपीएमच्या पुणे विभागाचे सचिव प्रकाश बिमलखेडकर यांनी व सूत्रसंचालन एनआयपीएम पुणे विभागाच्या अतिरिक्त महासचिव अमृता करमरकर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी फोर्ब्स फॅसिलिटी सर्व्हिसेस यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यातील विविध औद्योगिक कंपन्यांचे सुमारे दोनशेहून अधिक औद्योगिक संबंध अधिकारी यांच्यासह व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेच्या विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.