पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
पुणे दि. ३: पुणे महानगरपालिकेचे सिंहगड क्षेत्रीय कार्यालय, साई जनसेवा प्रतिष्ठान आणि ग्रीन व्हिजन मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ओल्या कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या टेरेस गार्डनचे उद्धाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, उपायुक्त आशा राऊत, वनराई संस्थेचे रविंद्र धारीया, साई जनसेवा प्रतिष्ठानचे सुरज लोखंडे, ग्रीन व्हिजन मॅनेजमेंटच्या गीता मेहेरकर, सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले, वेगवेगळ्या पद्धतीने कचऱ्याचे निर्मुलन करत स्वच्छ भारताच्या दिशेने आपण वेगाने वाटचाल करत आहे. या स्पर्धेतील पुणे शहराची कामगिरी अधिकाधिक उंचाविण्याची गरज आहे. एक सोसायटी म्हणजे एक गाव असे मानून विभागवार स्वच्छतेसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. ओला आणि सुका कचरा जिरविण्यासाठीची पुस्तिका नागरिकांपर्यंत पोहोचवावी आणि कचऱ्याचा उत्तम उपयोग होऊ शकतो हे त्यांना पटवून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
महानगरपालिकांच्या सर्व इमारतींवर असे प्रकल्प सुरू करावे आणि लोकप्रतिनिधींदेखील अशा अभिनव उपक्रमांसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. पुणे महानगरपालिकेने राबविलेला उपक्रम स्तुत्य असून याद्वारे नागरिकांनाही पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचे प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
असा आहे प्रकल्प
ओला कचरा सहज जिरविण्यासाठी व त्यापासून नागरिकांना फायदा मिळावा यासाठी सिंहगड क्षेत्रिय कार्यालयाच्या छतावर ‘टेरेस गार्डन’ हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पात तीस लिटरच्या 100 बकेटमध्ये रोज तीनशे किलो ओला कचरा जिरवला जात आहे.
दररोजचा ओला कचरा पुणे महापालिकेचे कर्मचारी आणि वडगाव येथील भाजी मार्केट मधील उरलेला भाजीपाला, फुलांचा कचरा आणून देतात. बकेटमध्ये कचरा जिरवताना बकेटला तळाला सात ते आठ होल्स करण्यात आले आहेत, बकेट मध्ये तळाला विटांचे तुकडे , त्यावर नारळाच्या शेंड्या, बायोकल्चर व ओला कचरा पुन्हा बायोकल्चर ओला कचरा व त्यामध्ये रोप असे थर देऊन भरण्यात आले आहेत.
या बगीच्यात फळझाडे, फुल झाडे, तुळसही लावण्यात आली आहे. बकेटमध्ये दीड वर्षापर्यंत ओला कचरा जिरला जाऊ शकतो आणि त्यात जमा झालेले खत काढून रोप पुन्हा लावता येऊ शकते. अशा प्रकल्पामुळे नागरिकांना घरगुती अथवा सोसायटी पातळीवर ओला कचरा जिरवणे सोपे असून सहज शक्य आहे. मोठ्या सोसायट्यानी इमारतीच्या टेरेसवर असा प्रकल्प केला तर त्यांचा ओला कचरा घरच्या घरी जिरविण्यासाठी मोठी मदत होईल.