जिनेव्हा: ओमिक्रॉन हा कोरोना विषाणूचा नवा अवतार अवतारल्यापासून जगभरात तब्बल ५० लाख कोरोनाबळींची नोंद झाली आहे. ही आकडेवारी निश्चितपणे अन्य कोणत्याही दुःखद घटनांपेक्षा मोठी आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस ओमिक्रॉनला धोकादायक विषाणू घोषित केल्यापासून जगभरात कोरोनाचे १३ कोटी रुग्ण आणि ५० लाख बळींची नोंद झाल्याचे संघटनेचे घटना व्यवस्थापक अब्दी महमूद यांनी सांगितले.
जगातील धोकादायक कोरोना विषाणू म्हणून ओमिक्रॉनने डेल्टाला झपाट्याने मागे टाकले आहे. या विषाणूच्या संसर्गाने गंभीर आजार होण्याचे प्रमाण कमी असले तरीही त्याच्या संक्रमणाचा वेग आणि प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे.
सध्याच्या काळात वैद्यकशास्त्राने मोठी प्रगती केली आहे. एखादा नवीन रोग आल्यास त्यावरील प्रभावी उपचारपद्धती आणि त्याला प्रतिबंध करणारी लस त्वरित विकसित करणे शक्य होत आहे. अशा काळात एखाद्या रोगाने तब्बल ५० लाखांचा बळी जातो, ही बाब गंभीर असल्याचे महमूद यांनी संघटनेच्या समाजमाध्यद्वारे साधलेल्या संवादात नमूद केले.
कोविड- १९ वर आरोग्य संघटनेच्या कोविड- १९ वरील तांत्रिक पथकाचे नेतृत्व करणाऱ्या मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी ओमिक्रॉनबाधितांची संख्या बुचकळ्यात टाकणारी असल्याचे नमूद केले आहे. ओमिक्रॉनबाधितांची आणि बळींची खरी संख्या ज्ञात असलेल्या संख्येपेक्षा खूपच जास्त असेल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. जग कोरोना महासाथीच्या मधल्या टप्प्यावर आहे आपण लवकरच या महासाथीच्या अंताकडे जाऊ; अशी मला आशा आहे. मात्र, अनेक देशात मागील सलग अनेक आठवडे मृत्यूची संख्या वाढल्याने चिंतेत भर पडत आहे, असेही त्या म्हणाल्या.
आरोग्य संघटनेच्या वतीने ओमिक्रॉनच्या चार उप-वंशांचा मागोवा घेतला जात आहे. त्यापैकी बीए १ हा प्रकार अधिक धोकादायक आहे तर बीए २ हा प्रकार अधिक संक्रमणशील आहे. या प्रकारामुळेच ओमिक्रॉनबाधितांच्या संख्येत वेगाने भर पडण्याची शक्यता आहे, असे सांगून व्हॅन केरखोव्ह म्हणाल्या की अजून तरी बीए २ मुळे बीए १ पेक्षा अधिक गंभीर आजार झाल्याची माहिती मिळालेली नाही. मात्र, कोणत्याही ठोस निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी सध्याचा अभ्यास अगदीच तोकडा आहे, असेही त्यांनी नमूद केले.
आरोग्य संघटनेच्या मंगलवारपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार कोविड-१९ चीनमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये उद्भवल्यापासून या विषाणूने जगभरातील ५७ लाख रुग्णांचा बळी घेतला आहे.