समृद्ध वास्तुकलेचा वारसा जपण्याचे आवाहन
पुणे : प्रतिनिधी
ओंकारेश्वर मंदिरामागे भिंतीजवळ नदीपात्रात असलेली गंगाधर केळकर यांची समाधी हा समाधी वास्तू उभारणीचा अप्रतिम नमुना आहे. सन १९२८ मध्ये उभारण्यात आलेल्या या समाधीजवळ गुरे बांधून या परिसराचा गोठ्यासारखा वापर सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे .
या समाधी स्थळाचे गोठ्यात रूपांतर करून मूळ रूप आणि भावना बदलू नये असे आवाहन केळकर कुटुंबीयांनी पुणे महापालिका आणि पुणेकरांना केले आहे.
स्थानिक परिसरातील काही जण समाधीच्या शेडमध्ये गुरे बांधून त्यांच्या चारा-पाण्याच्या सोयीसाठी वापर करून समाधी परिसराचा गोठा करीत असल्याचे केळकर कुटुंबियांच्या निदर्शनास आले. हे पाहून गंगाधर केळकर यांचे नातू असलेले विख्यात नेत्ररोगतज्ज्ञ डॉ श्रीकांत केळकर आणि कुटुंबीयांनी या समाधीला भेट देऊन पाहणी केली आणि गोठ्यासारखा वापर होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. महापालिकेने संबंधितांवर कारवाई केली पाहिजे,असे त्यांनी सांगितले.
समाधी वास्तू उभारणीचा अप्रतिम नमुना असलेली ही रचना केळकर संग्रहालयाचे संस्थापक दिनकर केळकर आणि त्यांचे बंधू भास्कर केळकर यांच्या कलाप्रेमाचा नमुनाही आहे. गंगाधर या शब्दाचा अर्थ शंकर असा असल्याने उभारणीच्या वेळेसच समाधीवर कलात्मकरीत्या पिंड(शिवलींग) बसवलेले आहे. पानशेतच्या पुरातून वाचलेली समाधी अजून येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेते .समाधीच्या मूळ स्वरूपाची जुनी छायाचित्रेही केळकर कुटुंबीयांकडे आहेत. नदीपात्रातील इतरही सर्व महनीय पुणेकरांच्या समाधीचा वारसा जपण्याचे आवाहन डॉ केळकर यांनी नागरिक आणि पुणे महापालिकेला केले.