सर्वसामान्यांमध्ये दातांच्या आरोग्याबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम
पुणे: प्रतिनिधी
दातांचे आरोग्य, दंतविकार, त्याबाबत घेण्याची काळजी आणि त्यावरील प्रभावी उपचार याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाणीवजागृती व्हावी यासाठी जगभरात १६ ऑक्टोबर हा दिवस जागतिक दंत आरोग्य दिन म्हणून साजरा केला जात आहे. या न अनुषंगाने एम ए रंगूनवाला दंतवैद्यकीय महाविद्यालयात दंत आरोग्याबाबत विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पारंपारिक पद्धतीप्रमाणे विकारग्रस्त दात काढून टाकण्यापेक्षा ‘रूट कॅनल’ सारख्या प्रभावी उपचारपद्धतीने दातांमधील विकार दूर करून नैसर्गिक दात वाचविण्याबाबत जनजागृती करणे, यावर या कार्यक्रमात भर देण्यात आला.
इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंडोंडॉटिक असोसिएशन आणि इंडियन इंडोंडॉटिक सोसायटीच्या वतीने दंत आरोग्य दिनाच्या निमित्ताने देशभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. विविध शाळा, महाविद्यालय आणि संस्थांमध्ये दंतआरोग्य, दंतविकार, प्रतिबंध आणि उपचार याबाबत जनजागृती करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी इंडियन इंडोंडॉटिक सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय मिगलानी यांनी दिली.
एम ए आर डी सी चे अध्यक्ष डॉ. पी ए इनामदार यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली. इंडियन इंडोंडॉटिक सोसायटीचे माजी अध्यक्ष आणि एम ए आर डी सी च्या प्रतिबंधात्मक दंतवैद्यक व इंडोंडॉटिक्स विभागप्रमुख डॉ. विवेक हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन इंडोंडॉटिक सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य आणि एम ए आर डी सी चे प्राध्यापक डॉ. समीर जाधव, डॉ. लिशा जैन यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात विशेष सहभाग घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमणदीप दुग्गल, उपप्राचार्य सलिका शेख हे देखील कार्यक्रमात सहभागी झाले.
मौलाना आझाद इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेसच्या माजी संचालिका व प्राचार्य संगीता तलवार म्हणाल्या की, नियमितपणे दातांची तपासणी आणि तोंडाच्या स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन हे दंतविकार टाळण्यासाठीचे सर्वात सुलभ तरीही प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहेत.
भारतासारख्या देशात दंत आरोग्य या विषयाला प्राधान्य मिळवून देण्यासाठी संघटित प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित करण्याच्या दृष्टीने जागतिक दंत आरोग्य दिन हा महत्त्वाचा दिवस असल्याचे प्रतिपादन. डॉ. हेगडे यांनी यावेळी केले.
जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी निंम्मे लोक किमान एक तरी दात विकारग्रस्त असलेले आहेत, अशी माहिती इंटरनॅशनल इंडोंडॉटिक जर्नलमध्ये गेल्या वर्षी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तब्बल ४० देशांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी पुढे आली आहे, याकडे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंडोंडॉटिक असोसिएशन्सचे महासचिव प्रा. डॉ. गोपी कृष्णा यांनी लक्ष वेधले. भारतासारख्या देशात तर हे प्रमाण तब्बल दोन तृतीयांश (६५ टक्के) एवढे आहे.
दातांचे दुखणे, किडणे किंवा दातांमधील फटी हे सर्वसामान्य विकार असल्याचे साधारणपणे मानले जाते. मात्र, या दंतविकारांचे पर्यावरण गंभीर स्वरूपाच्या नसांच्या विकारात होऊ शकते याची जाणीव सर्वसामान्य नागरिकांमध्ये असत नाही. भारतातील प्रौढ नागरिकांपैकी ६२ टक्क्यांहून अधिक लोकांना दंतविकाराने ग्रासले असून हे प्रमाण गंभीर आहे, याकडे वैद्यकीय महाविद्यालयाच्या दंतविकार विभागाचे प्राध्यापक डॉ. अजय लोगानी यांनी लक्ष वेधले.
दंतविकार हे केवळ दातापुरते मर्यादित नाहीत. दंतविकाराचा परिणाम म्हणून अन्न चावण्याची प्रक्रिया योग्य प्रकारे होत नाही. त्याचा परिणाम पचनसंस्था बिघडण्यावर होतो. पचनसंस्थेतील बिघाड हे विविध प्रकारच्या रोगांना आमंत्रण ठरते. त्यामुळे जगण्याचा दर्जा बिघडतो, असा इशारा डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल कोहली यांनी दिला.