पिंपरी, दि. १५ मे २०२२:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आणि “आपला परिवार सोशल फाउंडेशन” पुणे यांच्या सहकार्याने आज सकाळी पिंपरी येथील एच ए मैदान येथे “प्लॉगेथॉन ” मोहिम राबविण्यात आली.
देशात स्वच्छ सर्वेक्षण सुरू झाले असून पिंपरी चिंचवड शहराने या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने “स्वच्छाग्रह” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत आज प्लॉगेथाॅन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
‘क’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत झालेल्या प्लॉगेथॉन मोहिमेत क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी बी कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक राजेंद्र उजीनवाल, शांताराम माने, आरोग्य निरीक्षक शैलेश वाघमारे, लक्ष्मण साळवे, आपला परिवार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सुदाम शिंदे , उपाध्यक्ष अनिल शर्मा, सचिव अजित भालेराव, कार्याध्यक्ष किरण कांबळे, सहसचिव दत्तात्रय बोराडे, जनसंपर्क अधिकारी उद्धव वांजळे यांच्यासह २५० स्वयंसेवक, महापालिकेचे ७० कर्मचारी, बीव्हीजी ग्रुपचे कर्मचारी, डिव्हाईन संस्थेचे कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. तर ३ सुमो वाहने, १ ट्रक यांचा वापर करण्यात आला. ‘क’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत आज झालेल्या मोहिमेत सुमारे साडेआठ टन (८.५ टन) इतका कचरा संकलित करण्यात आला.
शहरातील स्वच्छाग्रह मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत शहराच्या विकासास हातभार लाऊन आपले कर्तव्य पार पडावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी यावेळी केले.
या उपक्रमात लोकसहभाग वाढविण्यासाठी शहरातील विविध गृहनिर्माण संस्था, हॉटेल्स, कंपन्या यांच्यामध्ये स्वच्छ स्पर्धा राबविण्यात आली. या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या गृहनिर्माण संस्था, हॉटेल्स, कंपन्यांना स्टार मानांकन देण्यात आले आहे. त्याच बरोबर अशा संस्थांना सामान्य करामध्ये सवलती देण्यात आल्या आहेत. ओला सुका कचरा विलगीकरण करणे, कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, कचऱ्यापासून खतनिर्मिती करणे अशा निकषाच्या आधारावर हे मानांकन देण्यात येत आहे.