उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा
मुंबई: प्रतिनिधी
एका व्यक्तीच्या किंवा एका पक्षाच्या हुकूमशाहीपेक्षा देशहिताच्या दृष्टीने आम्हाला संयुक्त सरकार हवे आहे, असे उद्गार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले.
जळगाव जिल्ह्यातील भारत राष्ट्र समितीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. या प्रवेश कार्यक्रमात ठाकरे बोलत होते.
काही काळापूर्वी पर्यंत हुकूमशाहीच बरी पण संयुक्त सरकार नको, असे वाटत असे. मात्र, कालांतराने अनेक पक्षांची संयुक्त सरकारी चांगले काम करू शकतात हे सिद्ध झाले आहे. एकाच पक्षाचे किंवा एका व्यक्तीच्या प्रभावाखाली असलेले सरकार असल्यास हुकूमशाही प्रवृत्ती बळावते, असा आरोप करून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला.
केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून दहा वर्षात त्यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन ते पूर्ण करू शकलेले नाहीत. प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये, कोट्यावधी तरुणांना नोकऱ्या, घरोघरी पाणी, भ्रष्टाचारमुक्त भारत यातील एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेले नाही, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.
सांगलीच्या उमेदवारीचा प्रश्न मार्गी लागला असून नाराज असलेल्या स्थानिक नेत्या कार्यकर्त्यांना समजावण्याची जबाबदारी काँग्रेसच्या नेत्यांवर आहे असेही ठाकरे म्हणाले.