मुंबई : एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथ संपुष्टात आली आहे. या नाट्यमय घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारला आपला पाठिंबा दिला आहे.
उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याबद्दल राज ठाकरे यांनी फडणवीसांचे कौतुक केले. विशेष म्हणजे फडणवीस यांनी सुरुवातीला नवीन सरकारचा भाग असण्याचे नाकारले होते आणि सरकारला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे सांगितले होते.
मात्र, पक्षाच्या हायकमांडच्या सांगण्यावरून त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये येण्याचे मान्य केले. यातच आज फडणवीस व राज ठाकरे यांची भेट होणार असल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत.