मुंबई: प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे धगधगते विद्यापीठ होते. मात्र, उद्धव ठाकरे यांना त्या वंदनीय विद्यापीठाचे शिष्यत्व टिकवता आले नाही. उद्धव ठाकरे ही राजकारणातील अयशस्वी शिष्याचे नामुष्कीजनक उदाहरण आहे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाच्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला.
उद्धव ठाकरे यांनी मागील दहा वर्षात देशाचे दिवाळी निघाले आहे, असा आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. चित्रा वाघ यांनी ट्विट करून या टीकेचे उट्टे काढले आहे.
उद्धवजी तुम्हाला राज्य सांभाळता आलं नाही, मुख्यमंत्रीपद पेललं नाही. पक्षही सांभाळता आला नाही, अशी टीका वाघ यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी नरेंद्र मोदी हे गुरु आहेत.. त्यांनी कलम ३७० हटविले. राम मंदिराची उभारणी केली. सर्जिकल स्ट्राइक केला. महिलांना आरक्षण दिले. जी २० चे आयोजन यशस्वी केले. या गुरुने जगभरात भारताच्या नावाचा धबधबा निर्माण केला आणि शिष्याने अनेक संकटे येऊनही राज्याचा कारभार पाच वर्षे यशस्वीपणे चालविला, असेही वाघ यांनी नमूद केले आहे.