मुंबई: प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही काळापूर्वी पुन्हा भाजपबरोबर येण्याचा प्रयत्न करून बघितला. सत्तेची लालसा त्यांना सत्तेपासून दूर राहू देत नाही. त्यामुळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आता भारतीय जनता पक्षाची धारे उद्धव ठाकरे यांच्यासाठी कायमची बंद झाली आहेत, अशी टीका भाजप नेते प्रसाद लाड यांनी केली.
अडीच महिने गायब असलेल्या आदित्य ठाकरे यांनी तीन महिन्यापूर्वी रश्मीवहिनीसोबत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ठाकरे यांना कालही सत्तेची लालसा होती आणि आजही आहे. हिंदुत्व विकण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. भाजपा शिवसेना युती सत्तेत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा एकही शब्द खाली पडू दिला नाही. आता मात्र आमची दारी त्यांच्यासाठी कायमची बंद आहेत, असे लाड म्हणाले.
महाविकास आघाडीची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी संजय पांडे या पोलीस अधिकाऱ्याच्या माध्यमातून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. आर्थिक गुन्हे विभागाचा ससेमिरा आमच्या मागे लावला. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि मला स्वतःला अटक करण्याचा त्यांचा डाव होता. या प्रकाराचा आम्हाला काही त्रासही झाला. मात्र आम्ही न भिता लढत राहिलो, असेही लाड यांनी सांगितले.