
कराची: वृत्तसंस्था
माजी क्रिकेट खेळाडू आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान आणि माजी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांना न्यायालयाने दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अत्यंत गोपनीय माहिती सार्वजनिक केल्याच्या आरोपावरून इमरान खान आणि कुरेशी यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण सिफर प्रकरण म्हणून ओळखले जाते. आपल्याला सत्ता भ्रष्ट करण्यास अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप इमरान खान यांनी सत्तेवरून पायउतार झाल्यावर केला होता. यासंबंधी अमेरिकन दूतावासाकडून आपल्याला एक गुप्त ध्वनीचित्रफीत मिळाल्याचा दावाही खान यांनी केला होता.
दोन साक्षीदारांची साक्ष आणि उपलब्ध पुरावे खान आणि कुरेशी यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यास पुरेसे आहेत असे स्पष्ट करत न्यायालयाने या दोघांनाही दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.