पिंपरी, (विश्व सह्याद्री ) : सरकारी यंत्रणांचा बेछूट गैरवापर करून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न केंद्रातील मोदी सरकारकडून केले जात असल्याचा गंभीर आरोप करत आपल्या चोपन्न वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत सूडाच्या राजकारणाने पेटलेले इतके बेजाबदार सरकार आपण पाहिले नसल्याची जळजळीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षानंतर शरद पवार दोन दिवसांच्या भेटीवर पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाले. शनिवारी आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्ह्म्णाले, ‘केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, एनसीबी या विविध संस्थांना हाताशी धरून राज्यातील मंत्री, वरिष्ठ अधिकारी, सत्ताधारी राजकीय नेते मंडळींच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावून महाविकस आघाडीचे सरकार अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मला संसदीय राजकारणात ५४ वर्ष झाली. चन्द्रशेखर, इंद्रकुमार गुजराल, देवेगौडा, व्ही. पी. सिह असे अनेक पंतप्रधान पाहिलेत; परंतु, सुडाचे राजकारण करून देशातील बिगर भाजप सरकारे अस्थिर करणारे इतके बेजाबदार सरकार आपण पहिले नाही.
महाविकास आघाडी सरकारचे मंत्री, राजकीय नेते मंडळी यांच्यावर बेछूट खोटे आरोप करायचे मात्र, पुरावे नसतांना चौकशा सुरु करून दडपण आणायचे अशी भाजपची नीती आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांचे नाव न घेता पवार म्हणाले, ‘ एक पोलीस अधिकारी थेट गृहमंत्र्यांवर शंभर कोटी वसूल केल्याचा आरोप करतो. एक नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला. मात्र, ज्याने थेट न्यायालयात हे आरोप केले; तो पोलीस अधिकारच परांगदा होतो, हे केंद्र सरकारला माहित नसावे काय, याला काय म्हणावे ? पण, केंद्र सरकार, संबंधित अधिकारी भाजपची नेतेमंडळी हे संगनमताने करीत आहेत.’
राष्ट्रवादीचेप्रवक्ते नवाब मलिक यांचे जावयावर गांजाच्या तस्करीचा खोटा आरोप करून त्यांना सहा महिने जेलमध्ये डांबून ठेवले. आता, तो गांजा नसल्याचे न्यायालयानेच स्पष्ट केले. सत्ता गेल्याने अस्वस्थ झालेले भाजपचे लोक महाविकास आघाडीचे सरकार पडावे कट-कारस्थानं करीत आहेत. पण, आता या सरकारला दोन वर्ष पूर्ण होतील, तरी तिन्ही पक्ष खंबीरपणे एकत्र आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले काम करीत असून सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल असा मला ठाम विश्वास पवार यांनी व्यक्त केला.