पिंपरी कँम्पमध्ये व्यापा-यांसमवेत पाहणी दौरा.
पिंपरी (दि. 22 फेब्रुवारी 2020) पुणे मुंबई महामार्गावरून पिंपरी कॅम्प मध्ये जाण्या-येण्यासाठी इंदिरा गांधी उड्डाणपूल 1987 साली उभारण्यात आला आहे. या पुलाची डागडुजी मागील एक वर्षापासून संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि व्यापा-यांच्या उत्पन्नावर देखिल परिणाम होतो. आता उड्डाणपुलावरून शगुन चौकात जाणारा रस्ता दुरुस्तीसाठी बंद आहे. हे दुरुस्तीचे काम पुढील पन्नास दिवसात पूर्ण करावे अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. याबाबत आयुक्तांनी लक्ष घालावे अशी मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी केली आहे.
पिंपरी मर्चंट फेडरेशनच्या व्यापाऱ्यांची बैठक पिंपरीमध्ये मंगळवारी अध्यक्ष व उद्योजक श्रीचंद आसवानी आणि प्रतिनिधींनी आयोजित केले होती. यावेळी पिंपरी कॅम्प मधील समस्या जाणून घेण्यासाठी आमदार अण्णा बनसोडे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, माजी उपमहापौर व जेष्ठ नगरसेवक डब्बू आसवानी, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, नीरज चावला, सुनील चूगाणी, प्रकाश रतनानी, नारायण पोपटाणी, अनिल आसवानी आदींसह बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते. या बैठकीनंतर व्यापाऱ्यांसमवेत आमदार बनसोडे, अध्यक्ष आसवानी, अतिरिक्त आयुक्त ठाकणे यांनी पाहणी दौरा केला.
यावेळी आमदार बनसोडे यांनी सांगितले की या पुलाच्या दुरुस्तीची अनेक वर्षांची मागणी होती. मागील वर्षी गोकुळ हॉटेल कडून उड्डाणपूलाकडे आणि मोरवाडी चौकाकडून उड्डाणपूलाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्यसाठी सहा महिन्याची मुदत होती. परंतु ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे एक वर्षापेक्षा जास्त काळ लागला. आता दोन दिवसांपासून उड्डाणपुलावरून शगुन चौकाकडे जाणारा रस्ता बंद केला आहे हे काम पुढील पन्नास दिवसात करून देऊ असे ठेकेदाराने सांगितले आहे. संबंधित ठेकेदाराला या ठिकाणी बोलावून घेतले होते. आता हा रस्ता वेळेतच पूर्ण झाला पाहिजे अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. तसे पत्र त्यांनी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना दिले आहे. तसेच अध्यक्ष श्री आसवानी यांनी सांगितले की पिंपरीतील दुकानांबाहेर पदांवरील सर्व अतिक्रमणे पथारीवाले आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण मनपाने ताबडतोब काढून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा. करोनामुळे मागील दोन वर्षांपासून व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे या परिसरातील व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी महानगरपालिकेने ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी मागणी केली आहे.