नवी दिल्ली: प्रतिनिधी
निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करणे आवश्यक नाही, असे विधान इंडिया आघाडीचे महत्त्वाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. आणीबाणी नंतर झालेल्या सन १९७७ च्या सार्वत्रिक निवडणुकीचे उदाहरण त्यांनी आपल्या विधानाच्या समर्थनार्थ दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी आघाडीतील काही घटक पक्षांकडून केली जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्याचा प्रस्तावही आघाडीच्या चौथ्या बैठकीत मांडला. अर्थात, याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करणे गरजेचे नाही, असे मत मांडले आहे. सन १९७७ मध्ये आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुका विरोधकांनी जनता पक्ष या नव्याने स्थापन झालेल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली लढल्या होत्या. त्यात विरोधकांनी विजय संपादन करून मोरारजी देसाई यांना पंतप्रधानपद देण्यात आले.
मात्र, जनता पक्षाने विजय प्राप्त करेपर्यंत निवडणूक प्रचाराच्या कालावधीत काँग्रेसविरोधी आघाडीने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. त्या काळात मोरारजी देसाई यांचे नाव कोठेही नव्हते. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच पंतप्रधान पदाची जबाबदारी देसाई यांच्यावर सोपविण्यात आली, याची आठवण पवार यांनी करून दिली आहे.
त्यामुळे सन २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाताना इंडिया आघाडीने पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्याची आवश्यकता नाही. मतदारांनी सत्तापरिवर्तनाचा निर्णय घेतला असेल तर पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला नसतानाही ते विरोधी आघाडीला मतदान करतील, असेही पवारांनी नमूद केले आहे.
इंडिया गाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांच्या आधीपासूनच संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांचे नाव अधिक चर्चेत आहे. त्यामुळे बॅनर्जी आणि केजरीवाल यांच्याकडून खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव आल्यानंतर नितीश कुमार नाराज असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, कोणीही पंतप्रधान व्हावे. आपल्याला त्यात रस नाही. आम्ही सारे केवळ निवडणूक जिंकण्याच्या निर्धाराने एकत्र काम करीत आहोत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करावा अशी मागणी केली नसली तरीही आघाडीसाठी एखाद्या ज्येष्ठ नेत्याला निमंत्रक अथवा समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी बैठकीत केली आहे.