प्रकाश आंबेडकर यांनी केली राहुल गांधी यांच्याकडे मागणी
मुंबई: प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडी दीर्घ काळापासून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी वैचारिक संघर्ष करीत असून या पक्षाला इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडी यामध्ये सहभागी करून घेतले तरच आपण भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होऊ, अशी अट वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमोर ठेवली आहे.
वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत समावेश होण्याबाबत आंबेडकर यांनी एक विस्तृत पत्र राहुल गांधी यांना पाठवले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्याबाबत कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. वंचित बहुजन आघाडी हा पक्ष फार जुना नसला तरीही आपण आणि आपले सहकारी दीर्घ काळापासून भाजप आणि संघ यांच्याशी वैचारिक संघर्ष करीत आहोत.
दलित, मुस्लिम, इतर मागासवर्ग, आदिवासी आणि समाजातील उपेक्षित घटकांसाठी आम्ही संघर्ष करत आहोत. या घटकांचा आम्हाला भक्कम पाठिंबा आहे. सध्याच्या धर्मांध आणि जातीयवादी विचारसरणीचा मुकाबला करण्यासाठी मोदी सरकार विरोधी घटकांनी एकत्र येण्याची नितांत आवश्यकता आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याचा जीवनाचे तत्व म्हणून अंगीकार करणाऱ्या सामाजिक लोकशाहीला प्रस्थापित करणे आवश्यक आहे, असे आंबेडकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आपण दिलेल्या निमंत्रणात, ‘आपण इंडिया आघाडीचे घटक आहात,’ असे नमूद करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी निमंत्रण मिळालेले नाही. या सहभागापूर्वीच मी आपल्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालो तर न झालेल्या युतीची चर्चा सुरू होईल. तसे होणे अयोग्य ठरेल. त्यामुळे आपण वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी होण्याचे निमंत्रण द्यावे. त्याचवेळी मी आपल्या यात्रेत सहभागी होऊ शकेन, असेही आंबेडकर यांनी पत्रात म्हटले आहे.