जालना: प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात जाहीर केल्याप्रमाणे मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाट पाहणे आपल्याला मान्य नाही. मराठा समाजाला दि २४ डिसेंबरच्या काल मर्यादितच आरक्षण मिळाले पाहिजे. अन्यथा राज्यभर पुन्हा आंदोलन उभारले जाईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळणार, असा अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातून सुचित होत आहे. मात्र, त्यासाठी कोणत्याही अहवालाची आवश्यकता नाही. ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाले आहे त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना कोणत्या अटींवर आरक्षण देणार याचे आदेश निर्गमित करणे एवढेच पुरेसे आहे. त्यामुळे आरक्षणासाठी फेब्रुवारीची वाट बघण्याची आवश्यकता नाही, असे मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.
ज्यांच्या १९६७ सालापासूनच्या कुणबी नोंदणी आढळल्या आहेत त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना आरक्षण देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या घोषणेमुळे सर्वांना आरक्षण मिळणार हे स्पष्ट होत आह. या निर्णयाबद्दल आपण पूर्णपणे नसलो तरीही अंशतः समाधानी आहोत. आता नातेवाईकांना आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र कायदा करणार की जिल्हाधिकाऱ्यांना त्यासंबंधी आदेश देणार, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. याबाबतचे स्पष्टीकरण दिनांक 24 पर्यंत न मिळाल्यास आपल्याला पुन्हा आंदोलनात उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.