
पुणे : प्रतिनिधी
भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी)च्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील ‘डॉ.पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धा -२०२४’ चे आयोजन दिनांक ९ जानेवारी २०२४ रोजी आयएमईडी, एरंडवणे, पौड रोड, पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे.
भारती विद्यापीठ आयएमईडीचे प्रभारी संचालक डॉ. अजित मोरे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
या स्पर्धेचे हे दहावें वर्ष आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. प्रथम क्रमांकास रुपये बारा हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकास रुपये दहा हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांकास आठ हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पारितोषिकांचे स्वरूप आहे.
‘गतीमान शिक्षणातून समाज परिवर्तन ’, ‘पत्रकारिता -सामाजिक प्रबोधन ’, ‘ आजचे राजकारण आणि समाज ‘, ‘ सोशल मीडिया -संधी की समस्या’, ‘कामाचे स्वरूप आणि आर्टिफिशियल इंटीलिजन्स’, ‘ व्यायाम -शारीरिक आणि मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली ‘, ‘ हवामान बदल -शाश्वत पद्धतीची निकड ‘, ‘ युद्ध -प्रगती की अधोगती ‘हे स्पर्धेचे विषय आहेत.
या स्पर्धेसाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून त्यात डॉ हेमचंद्र पाडळीकर, डॉ प्रमोद पवार, डॉ सचिन आयरेकर, डॉ विजय फाळके, डॉ हेमा मिरजी,उदय देसाई, प्रतिमा गुंड यांचा समावेश आहे.