दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), कोलकाता (पश्चिम बंगाल) हेडक्वार्टस् येथे ३७ वे नॅशनल कन्व्हेंशन उत्साहात पार पडले. यामध्ये देशभरातून विविध संशोधक व युवा वैज्ञानिक यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पीएचडी संशोधक विष्णू बनकर यांना वर्ष २०२३-२४ चा ‘आयईआय यंग इंजिनिअर्स ‘ पुरस्कार टेक्नो इंडिया विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. गौतम सेनगुप्ता, प्रोडक्शन डिव्हिजन बोर्ड इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) चे अध्यक्ष डॉ. सिरम सत्यनारायण, फ्लाक्त वुडस् लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष अलोक मुखर्जी, आयआयटी खरगपूरचे डॉ. झरेस्वर मैति तसेच डॉ. निर्मल दास, डॉ. पी. के. राय, डॉ. राजू बसक यांच्या हस्ते देऊन सन्मानित केले. या पुरस्कारासाठी देशभरातून तिघांची निवड करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातून विष्णू बनकर व इतर दोघेजण राजस्थान (आयआयटी) व पंजाब (एनआयटी) येथील आहेत.
बनकर यांनी शैक्षणिक, औद्योगिक व संशोधनात्मक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांचे टेक्निकल रिसर्च पेपरस् हे कॉन्फरन्स प्रोसिडिंग्स, आयएसएसएन, आयएसबीएन जर्नल्समध्ये प्रकाशित आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध अभियांत्रिकी ‘टेक्निक’द्वारे गुणवत्ता, उत्पादकता सुधारणा तसेच वेळ व पैसा यामध्ये बचत होतील आसे आमूलाग्र शास्त्रीय बदल करून विविध फलदायी उपक्रम राबविले आहेत.
‘ए.एम्.आय्.ई’ ही अभियांत्रिकीतील पदवी ‘प्रथम श्रेणी’मध्ये तर ‘एम्.ई.’ ही अभियांत्रिकीतील ‘पदव्युत्तर पदवी’ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून ‘विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी’मध्ये प्राप्त केली आहे.सध्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘सायन्स व टेक्नॉलॉजी’मध्ये ‘पी.एच्.डी’ करीत आहेत.
या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल डॉ. केशव नांदूरकर (बीओएस, प्रॉडक्शन इंजिनिअरिंग’ चे अध्यक्ष ), मंगेश येवले (वरिष्ठ सरव्यवस्थापक), मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ आदिंनी अभिनंदन केले आहे.