
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने रुग्णालयांसाठी खरेदी केलेल्या हाय व्हॅक्युम सक्षन मशीन खरेदीत गैरप्रकार झाल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी समोर आणले होते. याप्रकरणी त्यांनी हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून गैरप्रकाराकडे शासनाचे लक्ष वेधले. त्याला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात लेखी उत्तर दिले आहे. ठेकेदाराने निविदेत नमूद टेक्निकल स्पेशिफिकेशननुसार हाय व्हॅक्युम सक्षन मशीन पुरवठा केले नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी उत्तरात मान्य केले आहे. तसेच संबंधित ठेकेदाराला महापालिकेने दिलेला पुरवठा आदेश रद्द करून ठेकेदाराने निविदेसाठी सादर केलेली सुरक्षा अनामत रक्कम जप्त करण्यात आल्याचे लेखी उत्तरात म्हटले आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने रुग्णालयांसाठी २० हाय व्हॅक्युम सक्षन मशीन खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवली होती. त्यानंतर मे. सेवर्ड सिस्टम्स आयएनसी या पुरवठादार ठेकेदाराला कामाचा आदेश दिला होता. त्यानुसार या पुरवठादार ठेकेदाराने वैद्यकीय विभागाला मशीन पुरवल्या. मुळात या मशीन खरेदीची निविदाच एक प्रकारचा गडबड घोटाळा होता. निविदा प्रक्रियेमध्ये निश्चित केलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून संबंधित अधिकाऱ्यांनी या पुरवठादार ठेकेदाराला पात्र केले होते.
निविदेत मशीनमध्ये कोणत्या टेक्निकल स्पेशिफिकेशन असावेत हे नमूद आहे. त्यानुसार पुरवठादार ठेकेदाराने वैद्यकीय विभागाला मशीन देणे कायद्याने बंधनकारक आहे. प्रत्यक्षात पुरवठादार ठेकेदाराने वैद्यकीय विभागाला दिलेल्या मशीन निविदेत नमूद टेक्निकल स्पेशिफिकेशनच्या नसल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी समोर आणले होते. धक्कादायक बाब म्हणजे वैद्यकीय विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनीही निविदेत नमूद टेक्निकल स्पेशिफिकेशन नसलेल्या मशीन पुरवठादार ठेकेदाराकडून वायसीएम रुग्णालयात दाखल करून घेतल्या होत्या. त्यावरून या प्रकरणात अधिकारीही सामील असल्याचे स्पष्ट होते. धक्कादायक बाब म्हणजे निविदेत एका मशीनची किंमत सुमारे ६ लाख ८० हजार नमूद असून, सरकारच्या जीईएम पोर्टलवर याच मशीनची किंमत ३ ते ४ लाखांच्या घरात आहे. त्यावरून मशीन खरेदी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा काय डाव होता, हे स्पष्ट होते.
पुरवठादार ठेकेदाराने वैद्यकीय विभागाला दिलेल्या मशीनमध्ये निविदेत नमूद तब्बल १४ हून अधिक टेक्निकल स्पेशिफिकेशन नसल्याची बाब आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. या मशीन वापरात आणल्यास उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्या मशीन हाताळणाऱ्या वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला व जिवाला धोका होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. या मशीन खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत बेजबाबदारपणे संबंधित पुरवठादार ठेकेदाराकडून त्रुटीयुक्त व्हॅक्युक सक्शन मशीन घेतले होते. याप्रकरणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्तांना पत्र पाठवून अशा मशीन घेणे महापालिकेच्या आणि रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या हिताचे नसून बेकायदेशीर व नियमबाह्य असल्याचे म्हटले होते.
आता त्यांनी हे प्रकरण हिवाळी अधिवेशनात उपस्थित करून त्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित करून हाय व्हॅक्युम सक्शन मशीन खरेदीप्रकरणात दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली, अशी विचारणा राज्य सरकारला केली. आमदार लक्ष्मण जगताप यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यामध्ये त्यांनी संबंधित ठेकेदाराने निविदेतील अटी व शर्तीमध्ये नमूद टेक्निकल स्पेशिफिकेशननुसार हाय व्हॅक्युम सक्शन मशीनचा पुरवठा केले नसल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे महापालिकेने हे मशीन अस्वीकृत केले असून, ठेकेदाराला १३ जुलै २०२२ रोजी दिलेले पुरवठा आदेश रद्द करण्यात आले आहेत. तसेच ठेकेदाराने निविदेसाठी सादर केलेली सुरक्षा अनामत रक्कम जप्त करण्यात आल्याचे महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारला कळवल्याचे मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.