
पुणे: प्रतिनिधी
‘काँग्रेसचे तात्पुरते आमदार कायम ठेकेदारांच्या गराड्यात फिरणारे रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली. आमचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या वर टीका केली. मुळामध्ये जे स्वतः अधिकाऱ्यांना मारहाण करतात त्यांना आमच्या नेत्यावर बोलायचा नैतिक अधिकार नाही,’ अशी प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले की, ‘धंगेकर यांच्या कुठल्याही आरोपात तथ्य नाही. गुन्हेगारीमुक्त भयमुक्त वातावरण यासाठी महायुतीचे सरकार वचनबद्ध आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना राज्य गुन्हेगारीमुक्त करण्याचे कठोर आदेश दिले आहेत. गृह खाते मोहोळ यांच्याविषयात योग्य ती कारवाई नक्कीच करेल परंतु धंगेकर हे सवंग लोकप्रियतेसाठी अशी विधाने सातत्याने करत असतात. ते हवेने भरलेला फुगा आहेत आणि हा फुगा लवकरच फुटेल. त्यांना ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पडत आहेत, अशा शब्दात घाटे यांनी धंगेकर यांची खिल्ली उडवली.
ज्यांनी आमच्या दिवंगत आमदार मुक्ताताई टिळक यांचा १० कोटींच्या कामाचा विरोध केला, दुर्दैवाने तो निधी इतर ठिकाणी वळविला गेला. ज्यांना स्वतःच्या मातदारसंघातल्या जनतेची काळजी नाही त्यांनी कोथरूडची काळजी करावी, हे खरोखर हास्यास्पद आहे. स्वतःची उमेदवारी जाहीर करून मोकळे झाले. असे असले तरी आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा फाजील आत्मविश्वास हा नडणार आहे. चंद्रकांत पाटील हे गेल्या साडेचार वर्षात मोहोळ यांना भेटले देखील नाहीत. असे असताना धंगेकर यांनी केलेल्या आरोपात काहीच तथ्य नाही,’ असा दावा घाटे यांनी केला.
या पत्रकार परिषदेला सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, पुनीत जोशी, वर्षा तापकीर, संजय मयेकर, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले उपस्थित होते.