नवी दिल्ली: प्रतिनिधी
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची विनंती मान्य करून सुप्रीम कोर्टाने १० जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्याबाबत वेळकाढूपण केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ताशेरे उडून ३१ डिसेंबर पूर्वी निर्णय देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हिवाळी अधिवेशनाच्या काळातही अधिवेशनाचे कामकाज पार पाडून अपात्रता प्रकरणी सुनावणी नियमितपणे दररोज सुरू आहे. तरीही या प्रकरणाचा निकाल ३१ डिसेंबर पूर्वी देणे शक्य नसल्याचे लक्षात घेऊन नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मुदतवाढ मागितली.
आपण मुदतीत निकाल देण्यासाठी नियमित सुनावणी घेत आहोत. सुनावणीचे कामकाज २० डिसेंबर पर्यंत निश्चितपणे पूर्ण करण्यात येईल. मात्र, त्यानंतर तब्बल दोन लाख ७१ हजार पानांचे वाचन करून निकाल पत्र तयार करायचे आहे. त्यासाठी तीन आठवड्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी अध्यक्षांच्या वतीने न्यायालयाकडे करण्यात आली.
यावर शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी, हा नार्वेकर यांचा सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप न्यायालयात केला. मात्र, न्यायालयाने नार्वेकर यांची विनंती ग्राह्य धरूनही तीन आठवड्यांच्या ऐवजी दहा दिवसांची मुदतवाढ दिली असून १० जानेवारी पूर्वी निर्णय देण्याचे आदेश दिले आहेत.