मुंबई: प्रतिनिधी
आपला गट महायुतीत सहभागी होतानाच आगामी विधानसभा निवडणुकीत 80 ते 90 जागा देण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिले आहे. जागावाटपाची चर्चा सुरू होण्यापूर्वीच त्यांना या शब्दाची जाणीव करून द्या. ऐनवेळी कटकट नको, अशा शब्दात राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महत्त्वाचे नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बैठकीत बोलताना सुनावले.
लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच पक्षांनी त्या निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने त्यासाठी आज मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखली जात आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाकडे जितक्या जागा होत्या तितक्याच जागा या निवडणुकीत त्यांना मिळतील, या सूत्राने महायुतीत जागावाटप झाले. त्यानुसार अजित पवार गटाला राज्यात केवळ चार जागांवर निवडणूक लढविता आली. बारामती, शिरूर, रायगड, धाराशिव या जागा पवार गटाला देण्यात आल्या.
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासारख्या कटकटी विधानसभेच्या जागावाटपाबाबत होता कामा नये. भाजपा बरोबर येण्याचा निर्णय घेताना त्यांनी विधानसभेच्या 80 ते 90 जागा देण्याचे आश्वासन दिले आहे याची आठवण त्यांना वेळीच करून द्यावी. एवढ्या जागा लढवल्या तर त्यातील 50 ते 60 निवडून येतील. त्यामुळे लोकसभेप्रमाणे सध्या तुमच्या जेवढ्या जागा तेवढ्या विधानसभा निवडणुकीत मिळतील, अशी भूमिका पक्षाला परवडणारी नाही, याची जाणीव भुजबळ यांनी या बैठकीत करून दिली.