छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी
महाविकास आघाडीत सहभागी होऊन भाजपचे द्वेषाचे राजकारण रोखण्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघू. त्यासाठी आम्ही जागावाटपाचा फॉर्म्युला दिलेला आहे. तो मान्य नसेल तरी काही हरकत नाही. मग तुमचा फॉर्म्युला काय ते तरी सांगा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
वंचित बहुजन आघाडीशी शिवसेना शिंदे गटाची युती असून आघाडीला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याबद्दल चर्चा सुरू आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांवर आघाडीतील तिन्ही पक्षांनी प्रत्येकी १२ जागांवर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव आंबेडकर यांनी दिला आहे. तो ठाकरे गटाला अमान्य असून महाविकास आघाडीची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.
चाळीस बैठका होऊनही….
महाविकास आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटप निश्चित करण्यासाठी आतापर्यंत तब्बल ४० बैठका घेतल्या आहेत. मात्र, या ४० बैठकांमध्ये ४८ जागांच्या वाटपाचे सूत्र निश्चित करता आलेले नाही. त्यामुळे मग वेगळ्या चर्चा घडायला सुरुवात होते, असे आंबेडकर यांनी आघाडीला सुनावले आहे.
… तर वंचित बहुजन आघाडीची भाजपबरोबर सरळ लढत
वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत सहभाग झाला तर भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे सोपे जाणार आहे. अन्यथा वंचित बहुजन आघाडीची भाजपा बरोबर सरळ लढत होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे ही नुकसान होणार आहे. आमची शक्तीही वाया जाण्याची शक्यता आहे. आमची ताकद वाया जाऊ नये यासाठी आम्ही पुरेपूर काळजी घेत आहोत. आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची साथ हवी आहे. मात्र, आम्ही त्यासाठी कालमर्यादा घालून घेतली आहे. त्यामुळे उमेदवार निवडीच्या दृष्टीने आमची चाचपणी सुरूच राहील, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
पक्ष वाढवायचा की मोदींना हरवायचं हे निश्चित करा
विद्यमान सत्ताधाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थापन झालेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. यापुढे पक्ष अजूनही वाढवायचा की मोदींचा आणि भाजपचा पराभव करायचा याचा निर्णय काँग्रेसने घ्यायचा आहे. हा निर्णय झाल्यावरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले.
द्वेष हा संघ, भाजपाच्या राजकारणाचा पाया
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांची राजकीय शाखा असलेला भारतीय जनता पक्ष यांच्या राजकारणाचा द्वेष हा पाया आहे. हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील देश भावना संघ आणि भाजपने टोकापर्यंत आणली आहे. त्यामध्ये आणखी वाढ करण्यास वाव शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे संघ आणि भाजप यांनी आता मराठा आणि इतर मागासवर्ग यांच्यात तेढ निर्माण केली आहे. या दोन्ही समाजात एकमेकांविषयी द्वेष निर्माण होत आहे. हा द्वेष टोक गाठणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत, असेही आंबेडकर म्हणाले.