Home Politics आगामी निवडणुकीत बसपाचे ‘एकला चालो रे’ धोरण

आगामी निवडणुकीत बसपाचे ‘एकला चालो रे’ धोरण

लखनऊ: प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांनी एकजूट करून साकारलेली इंडिया आघाडी या दोघांबरोबर ही न जाता आगामी लोकसभा निवडणूक आणि चार राज्यातील विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी जाहीर केला आहे. आपला पक्ष इंडिया आघाडीत सहभागी झाला नाही म्हणून आपल्यावर भाजपा समर्थक असल्याचा आरोप करू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

लोकसभेत सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशात महत्त्वाचा विरोधी पक्ष असलेल्या बहुजन समाज पक्षाकडे सर्वच राजकीय पक्षांचे बारकाईने लक्ष आहे. या पक्षाने विरोधकांच्या इंडिया आघाडीत सहभागी व्हावे अशी विरोधकांची इच्छा आहे. मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया गाडी या दोघांसोबत न जाता स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय मायावती यांनी ट्विटर द्वारे जाहीर केला आहे.

रालोआ आणि इंडिया आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये सहभागी असलेल्या पक्षांपैकी अनेक पक्ष गरीब विरोधी, श्रीमंतधार्जिणे, भांडवलशाही विचारांचे आहेत. दलित आणि गरिबांना न्याय देण्याविषयी त्यांच्या विचारधारेत गांभीर्य नाही. त्यामुळे कोणत्याही आघाडीत सहभागी होण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेच्या विशेषतः गोरगरीब आणि वंचितांच्या हितरक्षणासाठी स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचा निर्णय बसपाने घेतला आहे, असे मायावती यांनी स्पष्ट केले.

विरोधकांच्या इंडिया आघाडीत सहभागी झाले तर धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी, जर सहभागी झाले नाही तर ते भाजपाला मदत करणारे, असे आरोप वारंवार केले जातात. मात्र असा ठपका ठेवणे हे आयोग्य आहे. त्यामुळे आपण इंडिया गाडीत सहभागी झालो नाही याचा अर्थ भाजपा समर्थक आहोत असा लावला जाऊ नये, अशी अपेक्षाही मायावती यांनी व्यक्त केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here