
नवी दिल्ली: प्रतिनिधी
एकेकाळी इंडिया आघाडीच्या जुळणीसाठी पुढाकार घेणारे संयुक्त जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेच आघाडीत अस्वस्थ असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी हे त्यांच्याशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात आहेत.
गांधी यांनी नितीश कुमार यांच्याशी गुरुवारी संध्याकाळी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, नितीश कुमार त्यावेळी बैठकीत असल्याने गांधी यांची त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही. त्यानंतर नितीश कुमार यांनी गांधी यांना संपर्क केला असता ते काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत व्यग्र होते. मात्र, आज रात्री दोन नेत्यांमध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
इंडिया आघाडीची चौथी बैठक दिल्ली येथे नुकतीच पार पडली. या बैठकीपासूनच, किंबहुना त्याच्या आधीपासूनच नितीश कुमार हे आघाडीत अस्वस्थ असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अनेक मुद्द्यांवर नितेश कुमार आणि आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांचे मतभेद आहेत. इंडिया आघाडीचे नाव बदलून भारत करावे, असा प्रस्ताव नितीश कुमार यांनी मांडला होता. मात्र, काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी तो हाणून पाडला. हिंदी भाषिक पट्ट्यातील तीन राज्यात काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर संभाव्य जागा वाटपाबाबतही काँग्रेसला झुकते माप देण्यास नितीश कुमार यांचा विरोध आहे.
इंडिया आघाडीत समन्वयक, निमंत्रक अशा कोणत्यातरी महत्त्वाच्या पदाची नितीश कुमार यांना अपेक्षा आहे. पंतप्रधानपद प्राप्त करण्याची त्यांची इच्छाही लपून राहिलेली नाही. मात्र, आघाडीच्या चार बैठका होऊनही नितीश कुमार यांच्या पदरी कोणतेही पद पडलेले नाही. तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रण अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे केले. या घडामोडींमुळे नितीश कुमार यांच्या अस्वस्थतेत भरच पडली असून त्यांची समजूत काढण्यासाठी राहुल गांधी त्यांना संपर्क साधत असल्याची चर्चा आहे.