पुणे: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांची आणि त्यांच्या पक्षाचीही सध्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. इतरांवर टीकाटिप्पणी करण्याऐवजी सुप्रियाताईंनी या लढाईवर अधिक लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे. सुप्रिया ताईंना सध्या जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी देवेंद्र फडणवीस दिसत आहेत, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
स्वतः उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या नागपूर मध्येच गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. वास्तविक, खुद्द फडणवीस यांनी सभागृहात सादर केलेल्या माहितीनुसार नागपूर येथील गुन्हेगारी आटोक्यात येत आहे. मात्र, या माहितीकडे लक्ष देण्यास सुप्रिया सुळे यांना वेळ नाही. सध्या त्यांना सर्वत्र देवेंद्र फडणवीसच दिसत आहेत, असे मोहोळ म्हणाले.
मराठा आरक्षण मिळत नसल्याबद्दलही सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. या टीकेचाही मोहोळ यांनी समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. ते आरक्षण न्यायालयात टिकवूनही दाखविले. मात्र त्यानंतर सत्तेत आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाची चर्चाही केली नाही किंवा त्यासाठी काही कृतीही केली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे स्वतः कित्येक वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्या काळात त्यांना मराठा समाजाच्या अडचणी दिसल्या नाहीत. अशा लोकांनी मराठा आरक्षणाबाबत इतरांवर टीका करणे जनतेला मान्य होणार नाही, असा दावा मोहोळ यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना त्यांच्या हातातून निसटली असून आता बारामतीची जागाही हातातून जाण्याची चिन्ह आहेत. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. मात्र, असे राजकारण करण्याऐवजी निकोप राजकारणाचा मार्ग पत्करला तर जनताही त्याचा स्वीकार करते, असा सल्लाही मोहोळ यांनी सुप्रिया सुळे यांना दिला आहे.