पिंपरी : प्रतिनिधी
गणाधीशा.., राधा ही बावरी.., मधूबाला, काय सांगू राणी मला गाव सुटना अशी एकाहून एक बहारदार गाणी. अवधूत गुप्ते आणि त्यांची सहकार्यांचे सुरेल सादरीकरण याने शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याची सांगता अविस्मरणीय ठरली.
नाट्य संमेलन हस्तांतरण सोहळा संपन्न झाल्यानंतर मुख्य सभामंडपात संपन्न झालेल्या या संगीतरजनीला नाट्यसंमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, युवा उद्योजक हर्षवर्धन भोईर आदि मान्यवर उपस्थित होते.
अवधूत गुप्ते संगीत रजनीची सुरुवात पार्श्वगायिका मुग्धा कऱ्हाडे हिच्या ‘ही गुलाबी हवा’ या गाण्याने झाली. प्रेक्षकांना मुग्धाच्या सुंदर आवाजाने मंत्रमुग्ध केले. पुढे लिटिल चॅम्प फेम कौस्तुभ गायकवाडने ‘राधा ही बावरी’ हे गाणे सादर करत रसिकांची मने जिंकली. त्या नंतर नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर यांची कन्या आणि गायिका मानसी घुले – भोईर यांनी ‘आता गं बया का बावरल’ आणि सार्थक भोसलेच्या साथीने ‘बहरला हा मधुमास नवा’ हे गाणे सादर करत आपल्या आवाजाची जादू उपस्थित प्रेक्षकांना दाखवत त्यांची मने जिंकली.
अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, गीतकार, संगीतकार आणि पार्श्वगायक अवधूत गुप्ते यांनी ‘गणाधीश’ या गाण्यातून श्री गणरायाला वंदन करत आपल्या गायनाची सुरुवात केली. पुढे त्यांचे गाजलेले ‘तुझे देख के मेरी मधूबाला’, ‘सखे तुझ्या नावाचं गं वेड लागल’ हे गीत सादर करत वातावरणात जोश निर्माण केला. त्यांनी काय सांगू राणी मला गाव सुटना …. म्हणताच पिंपरी – चिंचवडकरांनी एकाच जल्लोष करत त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी अभिनेता प्रतीक लाड, गौरव मोरे, अभिनेत्री जुई आणि दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी स्टेजवर एन्ट्री करत गाण्यात रंगत भरली. पुढे अवधूत आणि मुग्धा यांनी ‘उन उन व्हाटातून’ हे गाणे सादर करत रात्रीच्या थंडीला गुलाबी थंडीत परिवर्तीत केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या बहारदार संगीत रजनीचे निवेदन अभिनेता पुष्कर श्रोत्री याने केले.